नागपूर – काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची दखल घेत त्यांच्यावर कॉंग्रेसकडून कारवाई करण्यात आली. कॉंग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता आशिष देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आशिष देशमुख हे सावनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती.
आज पुन्हा एकदा आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या तिघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. या चर्चेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी आशिष देशमुख हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे आशिष देशमुख यांनी या सर्व शक्यतांचे खंडण केले आहे.
अमित शहांचे कौतुक
आशिष देशमुख यांच्याकडून आजच्या भेटीवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आजच्या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. राजकारणापलिकडे फडणवीस आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत. फडणवीस हे चांगले काम करणारे नेते आहेत. त्यांच्या कामाचे मी कौतुक करतो. अमित शहा हे देशाचे कार्यक्षम गृहमंत्री आहेत, अशा शब्दात देशमुख यांनी फडणवीस आणि शहा यांचे कौतुक केले आहे.