Hanumant Pawar Attack : पुण्यात राजकीय राडा! काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण; पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा आरोप
Hanumant Pawar Attack : स्टुडिओमधील कार्यक्रमानंतर तुषार दामगुडे आणि हनुमंत पवार यांच्यात बाचाबाची; पिस्तुलाचा धाक दाखवल्याचा पवारांचा दावा, स्वारगेट पोलिसांत धाव.

Hanumant Pawar Attack – काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा प्रकार सायंकाळी पाचच्या सुमारास एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर घडला. पवार यांना दामगुडे यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत जिवंत राहायचे आहे ना, अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, दामगुडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. एका दैनिकाच्या स्टुडिओमधील कार्यक्रमात पवार आणि दामगुडे सहभागी झाले होते.
त्यानंतर प्रथम दामगुडे बाहेर पडले. त्यानंतर फोनवर बोलत पवार बाहेर येत असताना कार्यालयाबाहेर थांबलेल्या दामगुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आवाज देऊन बोलावले. दोघांमध्ये वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे सांगितले जाते. पवार यांनी दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पवार यांच्या म्हणण्यानुसार, दामगुडे यांनी पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
जीव वाचवण्यासाठी ते पुन्हा कार्यालयातील सुरक्षारक्षकांकडे गेले. मात्र, दामगुडे आणि त्यांचे सहकारी दुचाकीवरून घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगितले जाते. हा संपूर्ण प्रकार कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पदाधिकारी ऍड. अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि अन्य कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले.
तसेच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि स्वारगेट पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनेची नोंद घेत परिसरात बंदोबस्त वाढवला. त्यानंतर पवार व काँग्रेस पदाधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी स्वारगेट पोलिसांत गेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.





