कोल्हापूर – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त टिप्पणी करणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची फिर्याद निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या सभेत त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा मागवला होता. मात्र, हा खुलासा अमान्य असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता धनंजय महाडिक यांच्यावर निवडणुकीची आचारसंहिता मोडल्याची फिर्याद दाखल करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले होते?
राजकारण करत आहात या पैशांचं? काँग्रेसच्या सभेत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या जाऊन फोटो काढायचे. आमच्याकडे फोटो द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. लय मोठ्याने कोण भाषण करु लागली, किंवा दारात आली तर लगेच फॉर्म देऊन सही घ्यायची आणि पैसे बंद करुन टाकायचे. आमच्याकडे काय पैसे लय झालेले नाहीत. आम्ही दुसऱ्या गरीब महिलेला देऊ आम्ही, पण असा दुगलेपणा येथून पुढे चालणार नाही, असे धनंजय महाडिक यांनी म्हटले होते.
धनंजय महाडिकांविरोधात कोर्टात जाणार – सुप्रिया सुळे
महाडिक यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपने महाराष्ट्राला लुटले आहे, महिलांना धमकी देण्याचे पाप भापजने केले आहे. महायुतीने आधी लाडकी बहीण योजना आणली आणि त्यानंतर महिलांना धमक्या द्यायला सुरुवात केली. भाजपचे हे घाणेरडे राजकारण आहे. धनंजय महाडिक यांनी महिलांना धमकी दिली आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार. यापूर्वी निवडणूक आयोगाकडे महाडिक यांच्याविरोधात आधीच तक्रार केलेली आहे. या गुंडगिरीविरोधात आम्ही पूर्णपणे लढू. भाजपकडे कुठलाही अजेंडा राहिलेला नाही, त्यामुळे भाजप घाणेरडे राजकारण करत आहेत. राज्यात भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारीचे आव्हान आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर हे प्रश्न आम्ही सोडवू असेही सुळे म्हणाल्या.
#WATCH | Pune, Maharashtra: NCP (SCP) leader Supriya Sule says, “The BJP has nothing to say against us because it has looted the country, looted the state…the BJP has committed the sin of threatening women…We will go to court against the threats being given to women by their… pic.twitter.com/5ZbIOXiVR5
— ANI (@ANI) November 11, 2024