पुणे : भुसार बाजारातील उलाढाल ऐन दिवाळीत मंद

पुणे – (विजयकुमार कुलकर्णी) नोकरदार वर्गाचा तयार फराळ खरेदी करण्याकडे वाढलेला कल… किराणा माल पारंपरिक दुकानातून भरण्याऐवजी मॉलमधून खरेदीचा ट्रेंड… ग्रामीण भागातून येणाऱ्या खरेदीदारांची घटलेली संख्या…वाढलेली महागाई… करोनामुळे कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्याने यंदा दिवाळी साजरी करायची नाही, या सर्वांचा परिणाम म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डातील भुसार विभागातील उलाढाल तब्बल निम्म्याने घटली आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात किराणा माल घाऊक भावात मिळत असल्याने पूर्वी शहर, उपनगर, ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांतून खरेदीदार पूर्वी मोठ्या संख्येने यायचे. ग्रामीण भागातील, शहरातील सर्व किराणा दुकानदार त्यांचा माल ठोक स्वरुपात येथून भरत. याबरोबरच येथे किरकोळ विक्रीही घाऊक भावात केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही दिवाळी अथवा दर महिन्याच्या किराणा येथूनच भरण्यास प्राधान्य देत होते.
मात्र, मागील काही वर्षांत शहरात, उपनगर आणि तालुक्याच्या ठिकाणीही मोठ-मोठे मॉल उभे राहिले आहेत. येथे घाऊक भावानेच किराणा माल नागरिकांना घराजवळ उपलब्ध होत आहे. आता काही कंपन्यांकडून तर नागरिकांना घरपोच किराणा पोहोचविण्यात येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम मार्केट यार्डातील ग्राहक कमी होण्यावर झाला आहे.
भुसार बाजारातील सर्व वस्तुंचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढले आहेत. त्याचाही उलाढालीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तर दुसरीकडे पूर्वी दिवाळीत घरोघरी मोठ्या प्रमाणात फराळाचे पदार्थ बनविले जात होते. नातेवाईक शेजारी, पाजाऱ्यांना देण्याची पद्धत होती. मात्र, विभक्त कुटुंब पद्धती आणि घरातील स्त्री-पुरूष दोघेही नोकरीला असल्याने तयार फराळ खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. एकत्र कुटुंब पध्द्धतीमध्ये पूर्वी पंधरा-वीस दिवस फराळ पदार्थ केले जायचे. मात्र, आता दिवाळीच्या तीन-चार दिवसच हे पदार्थ केले जातात. तसेच आरोग्याप्रती जागृकता वाढत असल्याने मोजकेच फराळाचे पदार्थ करण्याकडे कल वाढला आहे.या सर्व कारणांमुळे दिवाळीतील मार्केट यार्डातील घाऊक बाजारातील खरेदी घटली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढली आहे. करोनामुळे नागरिकांमध्ये पूर्वीसारखा उत्साह देखील नाही. त्यातच शहर, उपनगर आणि ग्रामीण भागांतूनही मार्केट यार्डात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी ऐन दिवाळीत बाजारपेठ ठप्प आहे. नेहमीच्या तुलनेत निम्मी उलाढाल होत आहे.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पुना मर्चंटस चेंबर.





