अगाणिस्तानमध्ये शाळा, काॅलेज सुरु; मात्र मुली आणि मुलांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेत केला हा बदल

काबुल – अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेल्यानंतर शिक्षणाबाबत नव्या राजवटीची काय धोरणे असतील याबाबत उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील शिक्षण संस्था जरी सुरू करण्यात आल्या असल्या तरी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये मुले आणि मुलींच्यामध्ये एक मोठा पडदा उभारण्यात आला आहे.
प्रत्येक वर्गामध्ये असा पडदा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. काबुल युनिव्हर्सिटीतील काही फोटो समोर आले असून त्यामध्ये वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये एक मोठा पडदा उभारण्यात आला आहे. तालिबान ने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे शाळा किंवा महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला बुरखा घालने बंधनकारक आहे. प्रत्येक मुलीला दिवसातील दिर्घकाळ आपला चेहरा झाकून घ्यावा लागणार आहे. त्यांनी नवीन नियमांप्रमाणे मुलींना फक्त महिलाच म्हणजेच शिक्षिका शिकवण्याचे काम करतील.
शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका उपलब्ध नसतील तर त्या संस्थेमध्ये वयस्कर शिक्षकांना शिकवण्याचे काम करावे लागेल. महाविद्यालयातून विद्यार्थिनींना म्हणजेच मुलींना पाच मिनिटे आधी बाहेर सोडले जाणार आहे. म्हणजेच कॉलेजची वेळ संपण्यापूर्वी पाच मिनिटे.आधीच सर्व महिला व विद्यार्थिनींनी कॉलेजच्या बाहेर पडणे बंधनकारक आहे.
विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्यांसाठी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र क्लास असावेत अशी सूचनाही तालिबान्यांनी केली होती पण अद्याप ती अमलात आलेली नाही म्हणूनच महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठामध्ये भरणाऱ्या वर्गांमध्ये मुले आणि मुली एकत्र बसले असताना मध्ये पडदा घालण्याचे बंधन करण्यात आले आहे.





