नेवासा: 7 लाखांचे 20 लाख द्या अन्यथा… सावकाराची असहाय महिलेला धमकी

नेवासा – शेतीचा न्यायालयीन वाद आणि पतीच्या आजारपणाच्या खर्चासाठी महिलेने एका खाजगी सावकाराकडून 7 लाख रुपये घेतले होते. मात्र तीन वर्षानंतर 7 लाखांचे 8 लाख रुपये परत कले, तरीही सावकाराकडून महिलेकडे 20 लाख रुपयांची मागणी होत आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत महिलेने नेवासा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करूनही पोलिस त्याची दखल घेत नसल्याचे महिलेने म्हंटले आहे.
काय आहे प्रकरण?
22 जानेवारी 2025 रोजी नेवासा पोलिस ठाणे येथे दाखल केलेल्या अर्जात अर्जदार नंदा खंडु पाटील (रा. भेंडा, ता. नेवासा. जि. अहिल्यानगर) यांनी म्हंटले आहे की, “आमचे मालकीचे गेवराई (ता.गेवराई जि. बीड) येथील शेतीचा वाद बीड दिवाणी कोर्टात चालु आहे. त्यासाठी आम्हाला मोठा खर्च आला होता. तसेच माझे पती खंडु पाटील यांना किडन्यांचा त्रास असल्याने त्यांच्यावर पुणे येथील हाॅस्पीटलमधे मागील दोन वर्षापासुन उपचार सुरु आहेत. त्यांचे किडन्यांचे त्रासामुळे माझे पती यांना दवाखान्यात खुप मोठा खर्च आला आहे. त्यामुळे दवाखान्याचा खर्च करणेकरीता, तसेच आमचे शेतीचे न्यायालयीन खर्चाकरीता आमचेकडे पैसे कमी पडु लागल्याने आम्ही आमचे गावातील शरद आरगडे यांचेकडुन 03 वर्षापुर्वी आम्ही 07 लाख रुपये घेतले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला पैसे देताना आमचेकडुन स्टॅम्प करुन घेतला होता. परंतु तो त्यांनी आम्हाला दिला नाही. त्यानंतर शरद आरगडे यांना आम्ही आजपावतो 08 लाख रुपये परत केले आहेत.
शरद आरगडे याचा आम्ही व्यवहार पुर्ण केला आसुन तो वेळोवेळी मला व माझे पती यांना फोन करुन तुम्ही माझे राहीलेले 20 लाख रुपये मला द्या असे म्हणत आहे. तेव्हा आम्ही त्याला तुझा व्यवहार आम्ही पुर्ण केला आहे, आता कशाचे पैसे द्यायचे, असे विचारले असता तो मी तुम्हाला दिलेले 07 लाख रुपयाचे 10 रु शेकड्याने आजपावेतो 20 लाख रुपये होतात ते तुम्ही मला द्या नाहीतर तुला व तुझे पती यांना उचलुन घेउन जा, तुम्ही जर पैसे दिले नाहीत तर तुम्हाला एकेकाला जिवे ठार मारुन टाकु अशी धमकी देत आहे.
त्यावेळी मी त्यांना माझे पतीचे दोन्ही किडन्या फेल झाल्याने ते दवाखान्यात उपचार घेत आहेत आम्ही तुमचे पैसे देउ, असे समजावुन सांगीतले होते. माझे पती हे पुणे येथे दवाखान्यात अँडमीट असल्याने शरद आरगडे हा माझे पती यांचे जिवाचे काही बरे वाईट करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझे तक्रारीची सखोल चौकशी होउन साहेबांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करावी व सावकारकीचा गुन्हा दाखल करावा ही विनंती. मला व माझे पती यांना चौकशीला बोलावले असता मी सर्व पुरावे सादर करीन, असे महिलेने तक्रार अर्जात म्हंटले आहे.
दरम्यान, अर्ज दाखल करून पंधरा दिवस उलटले तरीही पोलिस काहीही कारवाई करत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबात महिलेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.






