Newasa News : कुकाणा येथील बसस्थानकासाठी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्याकडून भर पावसात जागेची पाहणी
कुकाणा (ता. नेवासे) व परिसरातील (Newasa News) २५ ते ३० गावांतील प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची बसस्थानकाची मागणी आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

Newasa News : कुकाणा (ता. नेवासे) व परिसरातील (Newasa News) २५ ते ३० गावांतील प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची बसस्थानकाची मागणी आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी (दि. ३०) मुसळधार पावसातही डोक्यावर छत्री धरून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) अधिकाऱ्यांसोबत नियोजित बसस्थानकाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. आमदार लंघे – पाटील यांच्या या तत्परतेमुळे आणि ‘कामदार आमदार’ या कार्यशैलीमुळे कुकाणा परिसरामध्ये त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अनेक वर्षांची अडचण आणि ग्रामस्थांची मागणी
कुकाणे हे आसपासच्या सुमारे २५ ते ३० खेड्यांसाठी मध्यवर्ती केंद्र मानले जाते. त्यामुळे दररोज येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथे अद्ययावत बसस्थानक (Newasa News) नसल्याने प्रवाशांना रस्त्यालगतच ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत एसटीची वाट पाहावी लागत होती. प्रवाशांची ही बिकट समस्या लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्याकडे बसस्थानक उभारणीची आग्रही मागणी केली होती.
अडीच एकर जागेचा पाठपुरावा
कुकाणा गावात सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) सुमारे अडीच एकर जागा उपलब्ध आहे. ही जागा एसटी बसस्थानकासाठी मिळाल्यास येथे सुसज्ज व अद्ययावत बसस्थानक उभारणे शक्य होईल, अशी माहिती सरपंच लताताई अभंग व युवानेते अमोल अभंग यांनी दिली होती. यावर तात्काळ पाऊल उचलत आमदार लंघे – पाटील यांनी बांधकाम मंत्र्यांकडे प्रत्यक्ष भेटून व पत्राद्वारे सातत्याने पाठपुरावा केला होता.
सकारात्मक अहवाल पाठवणार: एसटी अधिकारी
बांधकाम विभागाची जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी एसटी महामंडळाचे स्थापत्य अभियंता अविनाश मंजुळे व नेवासे आगार प्रमुख ढवळे यांच्याशी संपर्क साधून गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाहणी दौरा निश्चित केला.
मुसळधार पावसात झालेल्या या पाहणीनंतर, “कुकाणा येथील या नियोजित जागेचा सकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल,” अशी माहिती स्थापत्य अभियंता अविनाश मंजुळे यांनी दिली.
गावात आनंदाचे वातावरण
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला बसस्थानकाचा (Newasa News) प्रश्न आता प्रत्यक्षात सुटण्याच्या मार्गावर असल्याने कुकाणा ग्रामस्थांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या पाहणी दौऱ्यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्यासोबत युवानेते अमोल अभंग, किरण शिंदे, मच्छिन्द्र कावरे, सुभाष चौधरी, दौलत देशमुख, बाळासाहेब कचरे आदी प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.






