Newasa News : आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीक्षेत्र देवगड संस्थान विकासासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर!
अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील (Newasa News) श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासाला आता मोठा वेग येणार आहे.

Newasa News : अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील (Newasa News) श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसराच्या सर्वांगीण विकासाला आता मोठा वेग येणार आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाकडून तब्बल ३ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग) अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचा प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय (GR) अधिकृतरीत्या जारी केला आहे.
देवगड परिसरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्य निकष समितीच्या १९ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत सखोल विचारविनिमय झाला.
समितीने अंदाजपत्रके व आवश्यक कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून निधीची सकारात्मक शिफारस केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित तरतुदीतून ३ कोटी रुपयांच्या कामांना अंतिम प्रशासकीय मान्यता दिली.
या मंजूर निधीतून देवगड संस्थानच्या भोजन प्रांगणात काँक्रिटीकरण करण्यात येणार असून, संपूर्ण मंदिर परिसरात आधुनिक विद्युत व्यवस्था आणि पर्यावरणपूरक सोलर सिस्टीमची कामे मार्गी लागणार आहेत. या कामांमुळे येथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.
देवगडच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करून कोट्यवधींचा निधी खेचून आणल्याबद्दल संस्थानच्या भक्तगणांनी व स्थानिक नागरिकांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे आभार मानले आहेत.






