Newasa News : शनिशिंगणापूर ॲप घोटाळ्याविरुद्ध काँग्रेस नेते संभाजी माळवदे यांच्याकडून आमरण उपोषण सुरु

नेवासा : शनिशिंगणापूर देवस्थानात बनावट ॲप, बनावट क्यूआर कोड आणि पावती पुस्तकांद्वारे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याविरुद्ध ठोस कारवाईची मागणी करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते संभाजी माळवदे यांनी आजपासून (1 जुलै 2025) शनिशिंगणापूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या घोटाळ्यामुळे शनिभक्तांची मोठी फसवणूक झाली असून, देवस्थानचे आर्थिक नुकसान झाले आहे.
घोटाळ्याची व्याप्ती आणि माळवदे यांचा लढा
गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ॲप घोटाळ्याने हादरले आहे. काही कर्मचारी आणि पुजाऱ्यांनी बनावट ॲप, क्यूआर कोड आणि पावती पुस्तकांच्या माध्यमातून देणगीचा मोठा निधी खासगी खात्यांवर वळवला. यामुळे देवस्थानला कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला आहे. माळवदे यांनी यापूर्वी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक आणि धर्मदाय उपायुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, समाधानकारक कारवाई न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. माळवदे यांनी मागणी केली आहे की, देवस्थानने तक्रार केलेल्या तीन बनावट ॲप्स व्यतिरिक्त इतर सात ते आठ ॲप्सचीही चौकशी व्हावी. तसेच, बनावट पावती पुस्तके, क्यूआर कोड आणि कर्मचाऱ्यांच्या बँक व्यवहारांची सखोल तपासणी व्हावी.
पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याचा इरादा
माळवदे यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत या प्रकरणी ठोस कारवाई होत नाही आणि पावसाळी अधिवेशनात वरिष्ठ पातळीवर चौकशीचे आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू राहील. या आंदोलनाला काँग्रेसचे संदीप मोटे, महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, संजय वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे शेषराव गव्हाणे, भाजपचे दादा घायाळ, संजय होडगर, कानिफ जगताप, शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे, हरीश चक्रनारायण, सतीश तऱ्हाळ, विजय गायकवाड, गणपत मोरे आणि अनेक शनिभक्तांनी पाठिंबा दिला.
शनिशिंगणापूर घोटाळ्यावर कारवाईची मागणी
“शनिशिंगणापूर देवस्थान आता सरकारच्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे. घोटाळ्यांची मालिका वाढतच आहे. ॲप घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड आहे आणि याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अपहार केलेला निधी पुन्हा देवस्थानच्या तिजोरीत जमा होणे गरजेचे आहे,” असे संभाजी माळवदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, यांनी ठणकावून सांगितले.





