नेवासा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींबद्दल अपमानजनक व्हिडीओ तयार करून त्याचा प्रसार केल्याप्रकरणी नेवासा शहर भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) वतीने कॉंग्रेस पक्षाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नेवासा शहराध्यक्ष मनोज पारखे आणि युवा मोर्चा शहराध्यक्ष शिवाजी लष्करे यांच्या नेतृत्वाखाली या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कॉंग्रेसवर गंभीर आरोप आंदोलनादरम्यान बोलताना युवा प्रदेश सचिव निरंजन डहाळे, प्रदेश सदस्य रामचंद्र खंडाळे, ज्येष्ठ नेते अशोक ताके आणि राजेंद्र मुथा यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानजनक व्हिडीओ तयार करून कॉंग्रेसने केवळ पंतप्रधानांचाच नव्हे, तर देशातील सर्व माता-भगिनींचा अपमान केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचा खालच्या पातळीचा राजकीय अजेंडा यामुळे उघड झाला आहे. पंतप्रधानांचा आदर तर सोडाच, पण मृत व्यक्तीबद्दलही कॉंग्रेस खालच्या थराला जाऊन विचार करते.” या घटनेचा भाजपाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांचा संताप, घोषणांनी निषेध आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांनी “कॉंग्रेसचा धिक्कार असो” आणि “मा का अपमान नही सहेगा हिंदुस्थान” अशा घोषणा देत कॉंग्रेसच्या कृतीचा जाहीर निषेध केला. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या या कृतीला देशाच्या सांस्कृतिक मूल्यांविरुद्ध आणि असंवेदनशील कृत्य ठरवले. आंदोलनात सहभागी नेते आणि कार्यकर्ते या निषेध आंदोलनात भाजपा व्यापारी सेल शहराध्यक्ष मनोज डहाळे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष आदिनाथ पटारे, शहर संयोजक करण पोटफोडे, राजेश कडु, रामदास लष्करे, अमोल पिटेकर, दिनेश गुंजाळ, विकास मंजुळकर, राहुल कुसळकर, मंगेश गोसावी, रोहित लष्करे, नानासाहेब डौले, महेश भुसारे, नितीन शिंदे, रोहन कुसळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.