न्यूझीलंड : जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितलं विजयामागचं कारण

ऑकलंड (न्यूझीलंड) – न्यूझीलंडमधील निवडणुकीमध्ये पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीने 49 टक्के मते मिळवून निर्विवाद विजय मिळवला. अर्डर्न यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना, हे कोरोना विषाणूला रोखण्यासाठी व अर्थचक्राला गती देण्यासाठी आपल्या सरकारने केलेल्या प्रयत्नांना मिळालेलं समर्थन असल्याचं म्हंटलं.
येत्या तीन आठवड्यांच्या कालावधीत सरकार स्थापन करून कोरोना विषाणू संबंधातील योजना प्राधान्याने राबविणार असल्याचं सांगितलं. त्या ऑकलंड येथील आपल्या निवास्थानाशेजारील एका कॅफेमध्ये बोलत होत्या.
यावेळी पत्रकारांनी, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून आपण अमेरिकन नागरिकांना काय संदेश द्याल असा प्रश्न विचारला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, जगभरातील लोक कट्टर पक्षाभिमान भूतकाळ जमा करोत अशी आशा व्यक्त केली. अनेकदा निवडणुका अशा भावनांना बळ देत असतात मात्र हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, न्यूझीलंडमधील निवडणुकीमध्ये जेसिंडा अर्डर्न यांच्या पक्षाचा प्रतिस्पर्धी असलेल्या नॅशनल पार्टीला केवळ 27 टक्के मते मिळवण्यात यश मिळाले. पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना या विजयामुळे सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळणार हे निश्चित झाले आहे.
संसदेतील बहुसंख्य जागांवर लेबर पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. न्यूझीलंडमध्ये प्रमाणबद्ध मतदान प्रक्रियेची गेल्या 24 वर्षांपासून अंमलबजावणी केली जाते आहे. तेव्हापासून एका पक्षाला इतके मोठे बहुमत मिळाले नव्हते.
सर्वसाधारणपणे न्यूझीलंडमधील राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी आघाडी स्थापन करावी लागत असे. मात्र यावेळी अर्डर्न आणि त्यांच्या लेबर पार्टीला यावेळी तशी आघाडी करावी लागणार नाही.





