लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी झाला. हा आनंद असतानाच दुसरीकडे मात्र या मॅचदरम्यान एक अघटित घटना घडली आहे. न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र मॅच खेळताना गंभीर जखमी झाला आहे. चेंडू झेलण्याचा प्रयत्न करत असताना रचीन याच्या चेहऱ्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे. यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर यावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघामध्ये सामना सुरू होता. पाकिस्तान विरोधातील या सामन्यात शाहने मायकेल ब्रेसवेलचा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि तो थेट रवींद्रकडे गेला. यावेळी रवींद्रने झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर जाऊन जोरात आदळला. चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळ्याने त्याला गंभीर इजा झाली असून रक्तस्त्राव देखील झाला असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अशा रक्तबंबाळ अवस्थेमध्येच रचीन रवींद्रला मैदान सोडावे लागले. हे रक्त पाण्यासारखे वाहत असल्याने फिजओने रचीन याचा चेहरा टॅावेलने झाकला.
न्यूझीलंड संघाच्या आक्रमक खेळीपुढे पाकिस्तान संघांची दाणादाण
या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखत ५० षटकांमध्ये ६ बाद ३३० धावा केल्या. फिलिप्सने तर ७४ चेंडूत सहा चौकार आणि सात षटकांसह नाबाद १०६ धावा करत चांगली खेळी खेळली. न्यूझीलंडने पाकिस्तानला 78 धावांनी पराभूत केले. न्यूझीलंड दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंची धमछाक झाली. पाकिस्तान संघ न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजापुढे टिकाव धरू शकला नाही. पाकिस्तान संघाला ४७. ५ ओव्हरमध्ये गाशा गुंडाळण्याची वेळ आली. या संघाने केवळ २५२ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानमध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये तिरंगी मालिका खेळवली जात आहे. पाकिस्तानशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही ही मालिका जिंकण्याच्या शर्यतीत आहेत.