Rachin Ravindra : न्यूझीलंडला मोठा धक्का! रचिन रवींद्र गंभीर दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर

Rachin Ravindra Ruled Out : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारी माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी जेम्स नीशम याला संघात स्थान देण्यात आले आहे.
न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांचे निवेदन –
न्यूझीलंडचे प्रशिक्षक रॉब वाल्टर यांनी रचिनच्या मालिकेतून बाहेर पडण्याबद्दल निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, मंगळवारी सरावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना रचिन रविंद्र बाउंड्री होर्डिंगवर आदळला, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या वरच्या ओठाला आणि नाकाला दुखापत झाल्याने त्याला टाके घालावे लागले, त्याला बरे होण्यासाठी वेळ लागेल.
Wishing Rachin Ravindra a speedy recovery 🤝 #AUSvsNZ #T20I #RachinRavindra pic.twitter.com/mhdTcPQQkt
— Mr. Cricket UAE (@mrcricketuae) October 1, 2025
रॉब वाल्टर पुढे म्हणाले,” रचिनच्या मालिकेतून बाहेर पडण्याने आम्ही सर्वजण खूप निराश आहोत. तो आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे, पण त्याचा फिटनेस ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. दोन आठवड्यांत इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे त्याला घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून तो त्या मालिकेसाठी उपलब्ध राहील.”
हेही वाचा – IND A vs AUS A : श्रेयस अय्यरचं दमदार कमबॅक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत झळकावले वादळी शतक
जेम्स नीशमला मिळाली संधी –
रचिनच्या जागी जेम्स नीशमला संघात स्थान देण्यात आले आहे. नीशमने आपल्या कारकिर्दीत 84 टी-20 सामन्यांत 955 धावा केल्या असून 47 बळीही घेतले आहेत. न्यूझीलंड 1 ते 4 ऑक्टोबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-20 सामने खेळणार आहे, तर 18 ते 23 ऑक्टोबरदरम्यान इंग्लंडविरुद्ध आणखी तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
यापूर्वीही रचिनला झाली होती दुखापत –
यावर्षी सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेदरम्यान झेल घेण्याच्या प्रयत्नात रचिनच्या कपाळाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तिरंगी मालिकेतील उर्वरित सामने आणि पाकिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर व्हावे लागले होते.
हेही वाचा – Asia Cup Trophy : अखेर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वींनी मानली हार, सुपूर्द केली आशिया कप २०२५ ची ट्रॉफी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ :
मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉन्वे, जेकब डफी, जॅक फाउल्क्स, मॅट हेन्री, बेव्हॉन जेकब्स, काइल जेमिसन, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, टिम रॉबिन्सन, बेन सियर्स, टिम सिफर्ट, ईश सोढी.





