न्यूयॉर्क : न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी आज न्यू जर्सीच्या रॉबिन्सविले येथील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. ॲडम्स यांनी मंदिर परिसरात सुमारे 2 तास घालवले आणि या भेटीत मंदिराच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. त्यांच्या दौऱ्यानंतर तेथील पूज्य संत आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली व बास्केटबॉल खेळण्याचाही त्यांनी आनंद लूटला. यावेळी त्यांना स्वामीनारायण यांच्या इतिहासाविषयीही माहिती देण्यात आली. चर्चेनंतर एरिक ॲडम्स रामायण आणि महात्मा गांधींबद्दल बोलले. ते हिंदू आणि बौद्ध धर्माचे चांगले जाणकार असून तरुणपणात त्यांनी बौद्ध भिक्खूंसोबत श्रीलंका, भूतान आणि नेपाळमध्ये प्रवास केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या नियोजित नॅशनल इंटेलिजेंस डायरेक्टर तुलसी गबार्ड यांच्यानंतर अक्षरधामला दिली गेलेली दुसरी हाय-प्रोफाइल भेट आहे. त्या देशातील सर्वात मोठ्या शहराचे महापौर आणि जगातील 10 वे सर्वात मोठे शहर म्हणून ॲडम्स 90 लाख लोकसंख्येचे नेतृत्व करतात. ही लोकसंख्या जवळजवळ न्यू जर्सीच्या संपूर्ण लोकसंख्ये इतकी आहे. तुलसी गबार्ड यांनी अक्षरधाम मंदिराच्या भेटीसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. अक्षरधाम मंदिरात पोहोचून आपल्याला खूप आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले होते.