न्यूयॉर्क – अमेरिकेच्या उत्तर आणि इसान्येकडील भागात आलेल्या हिमवादळामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. बर्फवृष्टी झाल्यामुळे रस्त्यांवरील तसेच हवाई मार्गाची वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. हिमवादळ आता पुढे सरकत असल्यामुळे दक्षिणेकडील काही भागांमध्येही बर्फवृष्टी सुरू आहे. या भागात थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. बर्फवृष्टीमुळे मोठ्या भूभागातील वीज पुरवठा कंडीत झाला आहे. तापमान उबदार ठेवणारी यंत्रणा बंद पडल्यामुळे नागरिकांना गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतो आहे. अर्कान्सास ते न्यू इंग्लंडपर्यंतच्या तब्बल २,१०० किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये रस्त्यावर फूटभरबर्फ साचले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक पुर्णपणे खंडीत झाली आहे. विमानांची उड्डाणे मोठ्या प्रमाणावर रद्द करावी लागली आहेत. शाळांनाही आज सुटी दिली गेली होती. पिट्सबर्गच्या उत्तरेकडील भागात २० इंचांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. बोचऱ्या हवामानामुळे सोमवारी रात्री आणि मंगळवारी तापमान उणे ३२ अंशांपर्यंत खाली घसरले आहे, असे राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे. रस्त्यावरील दृशयमानता कमालीची कमी झाल्यामुळे अर्कान्सास आणि टेक्सासमध्ये अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. निवारा नसलेल्या लोकांचा कुडकुडून मृत्यू होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. ओहिओ प्रांतातील मॅसेच्युसेटसमध्ये दोघांचा मृत्यू झाला. न्यूयॉर्क शहरात ८ जण मरण पावलेल्या स्थितीत आढळून आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी देशभरात साडे ७ लाख घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. यातील बहुतेक ठिकाणे दक्षिण अमेरिकेतील होती. मिसिसीपी आणि टेनेस्सीच्या उत्तरेकडील भागातही वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता. सोमवारी अमेरिकेत देशभरात ८,००० हून अधिक उड्डाणे विलंबित आणि रद्द झाली. सोमवारी मध्यपश्चिम, दक्षिण आणि ईशान्येकडील अनेक भागात शून्यापेक्षा कमी तापमान होते.