New York floods : अतिवृष्टीमुळे न्यूयॉर्कला पूरस्थिती; शहरांमध्ये निर्माण झाली आणीबाणीची स्थिती

New York floods : अतिवृष्टीमुळे अमेरिकेच्या इशान्येकडील भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी शहरांच्या काही भागांमध्ये पाणी साचले असून पूरामुळे अनेक वाहने रस्त्यांवर अडकून पडली आहेत. पुराचे पाणी भुयारी मार्गात घुसल्यामुळे हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. या शहरांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
संततधार पाऊस सुरू असल्यामुळे न्यूयॉर्, न्यूजर्सीसह पेनसिल्वेनिया आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये पूराचा इशारा देण्यात आला आहे. न्यूजर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी आणीबाणीची घोषणा केली असून नागरिकांना कारणाशिवाय बाहेर न जाता शक्यतो घरातच थांबण्याची सूचना देण्यात आली आहे.
न्यूजर्सीतील स्कॉट प्लेन्स भागातल्या रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे काही बस देखील जागेवरच थांबवाव्या लागल्या आहेत. बस आणि रेल्वेसेवाही स्थगित करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क शहरात काही भुयारी मार्गांवरील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे. तर अन्य मार्गांवरही पाणी साचल्यामुळे तेथील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. न्यूयॉर्क आणि हडसन शहरांच्या मध्यभागांना पुराचा मोठा फटका बसला असल्याचे न्यूयॉर्कच्या आपत्ती सेवा संस्थेने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मॅनहटन शहरातील भुयारी मार्गातील रेल्वे स्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. प्लॅटफॉर्मवरील प्रवासी देखील या पाण्यामुळे रेल्वेच्या आतच अडकून पडल्याचे सोशल मीडियावरच्या फोटोंमध्ये दिसते आहे. न्यूयॉर्कमधील सॉ मिल रिव्हर पार्कवे आणि क्रॉस ब्रॉक्स एक्प्रेसवे सारख्या मार्गांवर पुराचे पाणी आले आणि झाडेही पडली आहेत. त्यामुळे तेथील वाहतूक स्थगित केली गेली आहे.
स्टॅटन आयलंडमध्ये ४ ते ६ इंच पास झाला असून तेथेही पुराचा इशारा दिला गेला आहे. पेनसिल्वेनियाच्या अग्नेयेकडील भागात ५ तासांपेक्षा कमी कालावधीत ७ इंच पाऊस नोंदवला गेला आहे.





