NEW YEAR पार्टी पडली महागात ! अपघातात सहा तरूणांना गमवावे लागले प्राण

नवी दिल्ली – नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये अपघाताची मोठी घटना घडली आहे. थर्टी फर्स्टची पार्टी आटोपून घरी येणाऱ्या सहा मित्रांचा विचित्र रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. बिष्टुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्किट हाऊस एरिया परिसरातील गोल चक्कर येथे ही दुर्देवी घटना घडली आहे.
हे सहाही मित्र पार्टी आटोपून येत होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हाडरवर जाऊन आदळली. त्यानंतर ही कार झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत कारमधील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आल्याचे स्थानिकांनी सांगितले. आवाज ऐकताच घरातून लोक बाहेर पडले आणि आवाजाच्या दिशेने धावत सुटले होते.
स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. हे सहाही तरुण पार्टी करण्यासाठी कुठे गेले होते? कुठून येणार होते आणि कुठे जाणार होते? सकाळीही त्यांनी अल्कहोल घेतलं होतं का? याचा तपास पोलीस करणार आहेत. हे सहाही तरूण एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेले असावेत.
तिथून येताना हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे सहाहीजण आरआयटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलप्तांगा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, क्रेनच्या माध्यमातून कार रस्त्यावरून हटवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.





