कोंढवा बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट : पिडीतेकडून दिशाभूल, मात्र ‘अत्याचार झाला’ या भूमिकेवर ठाम

पुणे : कोंढवा येथील संगणक अभियंता तरुणीने दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणात तपासादरम्यान मोठा ट्विस्ट समोर आला आहे. तपासादरम्यान पिडीतेने पोलिसांना दिशाभूल केल्याची कबुली दिली आहे. मात्र, तिच्यावर जबरदस्ती झाल्याचा ती ठाम दावा करत असून संबंध ‘सहमतीने नव्हते’ असे तिचे म्हणणे आहे. या प्रकरणामुळे पोलिस तपासाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पिडीतेनुसार, ती सायंकाळी घरात एकटी असताना आरोपीने कुरिअर बॉय असल्याचे भासवून घरात प्रवेश केला. पेन घेण्याच्या बहाण्याने ती आत गेल्यावर आरोपीने तिच्या मागोमाग घरात येऊन दरवाजा बंद केला व चेहऱ्यावर स्प्रे मारून बलात्कार केला. एवढ्यावर न थांबता आरोपीने तिचा मोबाईल घेऊन तिच्यासोबत सेल्फी काढून “मी परत येईन” असा संदेश लिहून ठेवला.
सीसीटीव्ही फुटेज व ओळख नाकारली
तपासादरम्यान पोलिसांनी सोसायटीतील सर्व डिलिव्हरी बॉयना तपासले, पण पिडीतेने कोणालाही ओळखले नाही. सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसूनही पिडीतेने त्याला ओळखण्यास नकार दिला. मात्र, तपासात आरोपीसोबत तिचा पूर्वीपासून संपर्क असल्याचे उघड झाले. आरोपीचे छायाचित्र दाखवल्यावर पिडीता काही काळ स्तब्ध झाली आणि उलट पोलिसांना “हे छायाचित्र तुम्हाला कोठून मिळाले?” असा सवाल केला.
तपासासाठी तब्बल ५०० पोलीस कर्मचारी राबले
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेच्या १० आणि परिमंडळ ५ मधील १२ पथकांची रचना करण्यात आली. सुमारे ५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासले. बाणेर व कल्याणीनगर परिसरातून आरोपीचा माग काढून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीने पिडीतेशी पूर्वीपासून ओळख असल्याचे कबूल केले. व्हॉट्सअॅप कॉलिंगवरून दोघांनी भेट ठरवली होती, अशी कबुलीही त्याने दिली.
पिडीतेच्या वर्तनावर संशय
पिडीतेकडून सतत दिशाभूल, आरोपीची ओळख नाकारणे, आणि पोलिस तपासात असहकार यामुळे तीच्या आरोपांवर शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे तिच्या मानसशास्त्रीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात असून तिच्या नातेवाईकांनाही पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले आहे.




