Gen Z ला कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ, नक्की कारण काय?

Bank Loan | भारतात मध्यमवर्गीयांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच कर्ज काढणाऱ्यांचा आकडाही वाढला आहे. अगदी मोबाइलपासून ते घर खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज काढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे पाहायला मिळाले. मात्र, पहिल्यांदाच कर्ज मंजुरीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे.
प्रामुख्याने Gen Z ला (1997 नंतर जन्मलेल्या) कर्ज काढताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बँकांकडून या वयोगटातील तरूणांना कर्ज देताना सावधगिरी बाळगली जात आहे.
डिसेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत भारताच्या किरकोळ कर्ज (Retail Credit) बाजारात मोठी घसरण दिसून आली. बँका आणि वित्तीय संस्था पहिल्यांदाच कर्ज काढणाऱ्यांच्याबाबत सावध भूमिका घेत आहे. ज्यामुळे त्यांना कर्जासाठी अडचणी येत आहेत.
बँकांच्या कठोर भूमिकेचा सर्वाधिक परिणाम फटका क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या Gen Z ला बसला आहे. ट्रान्सयुनियन CIBIL च्या रिपोर्टनुसार, प्रथमच कर्ज काढणाऱ्यांना कर्ज मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा संपूर्ण क्रेडिट बाजारावर परिणाम झाला.
प्रथमच कर्ज काढणाऱ्यांच्या कर्ज मंजुरीत 21% घट झाली. तर, आधीपासूनच क्रेडिट हिस्ट्री असलेल्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या कर्जात फक्त 2% घट दिसून आली. याचा अर्थ बँका आणि वित्तीय संस्थांनी नवीन ग्राहकांना कर्ज देताना अधिक सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.
कर्ज मंजुरीत घट होण्याचे प्रमुख कारण बँकांकडून जोखीम व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बँकांनी आपल्या जोखीम व्यवस्थापनाच्या धोरणांतर्गत प्रथमच कर्ज घेणाऱ्यांसाठी कर्ज मंजुरी प्रक्रिया अधिक कठोर केली आहे.





