बंगालमध्ये कॉंग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष; शुभंकर सरकार यांच्याकडे जबाबदारी

नवी दिल्ली – कॉंग्रेसने अखेर पश्चिम बंगालमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती केली. त्यानुसार, शुभंकर सरकार यांच्याकडे पक्षाने प्रदेश शाखेची धुरा सोपवली. याआधी ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी यांच्याकडे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाची बंगालमध्ये सुमार कामगिरी झाली. त्यानंतर चौधरी यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर पक्षाने नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या. बंगालमधील नेत्यांचा फिडबॅक घेतल्यानंतर सरकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. बंगालमधील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसबरोबरचे संबंध सलोख्याचे रहावेत यादृष्टीने सरकार यांना पसंती देण्यात आल्याचे समजते.
चौधरी यांच्याकडून सातत्याने तृणमूलवर टीकेची झोड उठवली जात होती. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि तृणमूलमध्ये हातमिळवणी न होण्यामागे तेही एक कारण असल्याचे मानले जाते. कॉंग्रेस आणि तृणमूल हे राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक आहेत.
मात्र, बंगालमध्ये त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचेच वारंवार दिसून आले. आता कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर ते चित्र बदलण्याची शक्यता आहे. सरकार यांच्याकडे याआधी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी होती. प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आल्याने त्यांना त्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.





