छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी, चित्रपटाचे जबरदस्त पोस्टर आले समोर

Rishabh Shetty New Movie | छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा केला जातोय. किल्ले शिवनेरीसह विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष दिनानिमित्ताने ‘कांतारा’ फेम अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ या सिनेमाचे नवीन पोस्टर समोर आले आहे.
‘दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटात ऋषभ शेट्टी हा शिवरायांची भूमिका साकारणार आहे. गेल्यावर्षीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी चित्रपटाचे एक पोस्टर देखील समोर आले होते. आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरमध्ये छत्रपतींच्या भूमिकेत ऋषभ शेट्टी देवीसमोर उभा असलेला दिसत आहे.
View this post on Instagram
चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सिंग यांनी हे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘जय भवानी! जय शिवाजी! हर हर महादेव!! सर्वश्रेष्ठ योद्धा राजा, भारताचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त, आम्ही पहिला लूक सादर करत आहोत. यामध्ये त्या ऐतिहासिक राजाचे सामर्थ्य आणि भक्ती दर्शवली आहे, ज्याने संपूर्ण उपखंडाचे भाग्य बदलले. हा एक सन्मान आहे की आम्ही त्यांची असामान्य वीरता, सन्मान आणि स्वराज्याची गाथा एका अद्वितीय टीमसह पडद्यावर आणत आहोत.’
‘दी प्राइड ऑफ भारत – छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपट 21 जानेवारी 2027 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदीसह कन्नड, तेलुगु, तमिळ, मराठी, मल्याळम आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होईल. या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.





