Shiv Jayanti 2026 – पिंपरी चिंचवड शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागांत शिवभक्तांनी पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराजांना अभिवादन केले. शहरात अनेक ठिकाणी पाळणा गात महिलांनी बालशिवाजीच्या जन्माचा उत्सव साजरा केला. निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान परिसरात पहाटेपासूनच शिवभक्तांची गर्दी उसळली होती. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती शक्ती शिल्पासमोर पारंपरिक पद्धतीने पाळणा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आरत्या सादर करत वातावरण भक्तिमय केले. शहरातील विविध भागांत लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कुणी महाराजांच्या पोशाखात, तर कुणी तानाजी, बाजीप्रभू यांसारख्या शूर मावळ्यांच्या वेषात सहभागी झाले होते. चिमुकल्यांनी आपल्या सायकलींना भगवे झेंडे लावून फेरी काढली. “हर हर महादेव” च्या जयघोषात ही सायकल रॅली निघाली. नागरिकांनी या लहानग्यांचे कौतुक करत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. आकुर्डी गावात अखिल शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने उत्साहात पाळणा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. तरुणाईने भगवे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला. शहरातील अनेक भागांत व्याख्याने, शिवचरित्र कथन, पोवाडे आणि देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून शिवजयंतीचा सामाजिक संदेशही देण्यात आला. शहरात शिवजयंतीचा उत्सव भक्तिभाव, अभिमान आणि ऐतिहासिक स्मरण यांच्या संगमाने साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा आणि स्वराज्याच्या विचारांनी पुन्हा एकदा शहर शिवमय झाले.