New LPG Rules : आता गॅस सिलिंडरसाठी पाहावी लागणार ‘इतकी’ वाट; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
New LPG Rules : आखाती देशांतील तणावामुळे आयातीवर परिणाम होण्याची शक्यता; संभाव्य टंचाई टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून मर्यादित पुरवठ्याचे धोरण.

New LPG Rules – आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे भीषण सावट आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहे. गॅस तुटवड्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, आता ग्राहकांना दुसरा घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तब्बल २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
यापूर्वी हा कालावधी १५ दिवसांचा होता, तो आता १० दिवसांनी वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नव्या सूचनांनुसार, आता घरगुती आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना महिन्यातून केवळ एकच सिलिंडर दिला जाणार आहे. गॅस वितरक कंपन्यांना यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, कोणताही पूर्वसूचना न देता हा निर्णय अचानक लागू झाल्याने गॅस एजन्सी आणि ग्राहकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आखाती देशांमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या आयातीवर युद्धाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
भविष्यात मोठी टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध साठ्याचा वापर योग्य रीतीने व्हावा, यासाठी सरकारने मर्यादित पुरवठा सुरू केला आहे. यापूर्वी पहिला सिलिंडर मिळाल्यानंतर १५ दिवसांनी दुसरे बुकिंग करता येत होते. आता २५ दिवसांची अट आल्यामुळे मोठ्या कुटुंबांचे महिन्याचे बजेट आणि नियोजन कोलमडणार आहे.




