क्रामातोर्सक (युक्रेन) – रशियाने शनिवारपासून युक्रेनवरील आपले हल्ले पुन्हा एकदा वाढवले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. आज पहाटेच्या सुमारास युक्रेनच्या उत्तरेकडील चुहुइव्ह शहरात रशियाने केलेल्या रॉकेट हल्ल्यात किमान तिघेजण ठार आणि तिघेजण जखमी झाले आहेत. ही रॉकेट थेट रशियाच्या हद्दीतून डागली गेली होती, असे खारकिव्हचे पोलीस उपप्रमुख सेरहिय बोलविनोव्ह यांनी सांगितले.
रशियातील बेलगोरोड शहरातून रात्री 3.30 वाजता डागलेल्या या रॉकेटमुळे एक रहिवासी इमार, शाळा आणि प्रसासकीय इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे, असे बोलविनोव्ह यांनी फेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. शेजारच्याच सुर्नी भागात रशियाच्या सैन्याने केलेल्या उखळी तोफांच्या माऱ्यात एक जण ठार झाला आणि किमान 7 जडण जखमी झाले आहेत. रशियाच्या सीमेजवळची तीन गावे आणि खेड्यांवर जोरदार गोळीबार देखील करण्यात आला, असे प्रादेशिक गव्हर्नरांनी म्हटले आहे.
युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेत्सक प्रांतातील काही शहरांवर गेल्या 24 तासात रशियाच्या हल्ल्यांमध्ये 7 जण ठार आणि अन्य 14 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे युक्रेनच्या फौजांनी पूर्व महामार्गावरील रशियाचा हल्ला परतवून लावला, असे लुहान्सक प्रांताच्या गव्हर्नरांनी म्हटले आहे.
लिसेचान्सक आणि बाखमत या शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न रशिया गेल्या दोन महिन्यांपासून करत आहे. मात्र अद्याप रशियाला या महामार्गाचा काही किलोमीटरचा भाग देखील रशियाला ताब्यात घेता आला नसल्याचे लुहान्सकच्या गव्हर्नरांनी म्हटले आहे.