New Delhi : नवी दिल्लीत ई-रिक्षाला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्लीतील (New Delhi) विश्वास नगर भागात एका निवासी संकुलात असलेल्या ई-रिक्षा पार्किंगच्या ठिकाणी रविवारी पहाटे भीषण आग लागली.

New Delhi : नवी दिल्लीतील (New Delhi) विश्वास नगर भागात एका निवासी संकुलात असलेल्या ई-रिक्षा पार्किंगच्या ठिकाणी रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. ही आग पहाटे ४.१५ वाजता सीबीडी शहादरा परिसरातील युनिटी मॉलजवळील गल्ली क्रमांक ११ मधील एका घरात लागली.
या इमारतीत तळमजल्यासह आणखी तीन मजले आहेत. यातील तळमजल्यात ई-रिक्षा चालविणारे काही जण भाड्याने राहत होते. रात्री एका ई-रिक्षाला चार्जिंगसाठी जोडण्यात आले होते. आग लागल्यानंतर (New Delhi) ई-रिक्षामध्ये मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. ई-रिक्षाच्या चार्जिंग दरम्यान लागलेल्या आगीने काही क्षणांतच घराला विळखा घातला. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर मध्यम मजल्यावर अडकलेल्या सहा जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढत तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौघांना मृत घोषित केले. तर इतर दोन जण सुमारे १० टक्के भाजले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास (New Delhi) सुरू आहे.






