Harshwardhan Sapkal : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मंगळवारी सूत्रे स्वीकारण्याची शक्यता

मुंबई : विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेंसने जबर आपटी खाल्ल्यांनंतर राज्यातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना हटवून बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळांना त्यांच्याजागी बसवले असले तरीही अन्य ज्येष्ठ नेत्यांना डावलून राहुल गांधीनिष्ठ म्हणून सपकाळेंना दिलेली ही बक्षिसी असल्याचे अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. काल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन अचानक हटवले आणि त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केल्याचे प्रसिध्द पत्रक जारी करत त्यांना शुभेच्छा दिल्या तथापि सपकाळ यांनी अद्याप त्यांच्या पदाची सूत्रे स्विकारली नाहीत. ते मंगळवारी टिळकभवनात सूत्रे स्विकारण्यासाठी येणार आहेत.
तोपर्यंत पक्षातील ईच्छुक नाराजांचे बरेचसे पाणी पुलाखालून व वरुन वाहण्याची शक्यता काँग्रेसजनांनी गृहीत धरली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेतच नव्हते.बाळासाहेब थोरात ईच्छुक नसले तरीही त्यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण,अमित देशमुख, यशोमती ठाकूर,विश्वजीत कदम,आदि नेतेमंडळींची नावे चर्चेत होती.त्यामुळे या नेत्यांपैकी एखादा भक्कम नेता पक्षांत मागे उभा राहिला तर झेप घेत पुन्हा पक्षाला उभारी देण्याच्यादृष्टीने तयारी करण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा ईरादा होता.
अचानक दिल्लीत कॉंग्रेस हायकमांडकडे दोन दिवसांपासून गुप्तपणे सूत्रे फिरली.आणि बुधवारी दुपारी सपकाळांना बोलावून त्यांची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारण्याची मानसिक तयारी असल्याबद्दलची चाचपणी घेण्यात येऊन काँग्रेस युवराज राहुल गांधीकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आले. सपकाळ यांनींही आढेवेढे न घेता पक्ष देईल ती जबाबदारी आपण पेलू असे पक्षनेत्त्व करणाऱ्या खर्गेंपुढ्यात सांगितले.काल सकाळी पुन्हा राहूल गांधींकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच त्यांच्या नियुक्तीबद्दलचे पत्रक जारी झाले.
राज्यातील कॉंग्रेंस कार्यकर्त्यांत नवचैत्यन्य दिसले असे काही टिळकभवन व तन्ना हाऊसकडील कॉंग्रेंस कार्यकर्त्यांकडून जाणवले नाही.पटोले जाणार हे निश्चीत झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अनुभवी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाच्या अपेक्षेत होते.पण राहूल गांधींच्या ईच्छेपुढ्यात स्वत:च्या मर्यादा ओळखून कार्यकर्ते विरोध करण्यापेक्षा गांधींचा नवा बदल स्विकारत आहेत.
१९८२ साली आहे तत्कालीन दिवगंत पंतप्रधान इंदिरा गांधींनी बाबासाहेब भोसलेंचा जो प्रयोग महाराष्ट्रात केला होता.तसाच राहुल गांधीकडून झालेला नवा बदल म्हणून काँग्रेसजन पाहत आहेत. कॉंग्रेसच्या उच्च वर्तुळात मुकुल वासनिकांच्या कार्यकर्त्यांनी सतत दिल्लीतील काही ज्येष्ठ नेत्यांचा पाठपुरावा केल्यामुळे हायकमांडला पटोलेंना पर्याय नसतानाही हटवून सपकाळ यांची नियुक्ती करावी लागल्याची खसखस कॉंग्रेसमध्ये पिकत आहे.काँग्रेसच्या राज्यातील एका प्रवक्त्याकडून मात्र काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची सहमती होती म्हणूनच ही नियुक्ती झाल्याचा दावा केला.





