CBFC Sensor Board New Members : सेन्सॅार बोर्डाची नवी कार्यकारणी जाहीर! पंकज त्रिपाठी, प्रीती झिंटासह मराठीतील ‘या’ कलाकारांचा समावेश
CBFC Sensor Board New Members : नव्या कार्यकारिणीत मराठी कलाकार निशिगंधा वाड, पल्लवी जोशी आणि वामन केंद्रे यांचा समावेश करण्यात आला आहे.

CBFC Sensor Board New Members : तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सीबीएफसीच्या (CBFC) नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नव्या सदस्यांची नावे जाहीर करत मंडळाची पुनर्रचना केली आहे.
शशी शेखर वेम्पती यांच्या अध्यक्षतेखालील या नव्या कार्यकारिणीत एकूण १८ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कार्यकारिणीत बॉलिवूडसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनाही स्थान देण्यात आले आहे.
नव्या कार्यकारिणीत मराठी कलाकार निशिगंधा वाड, पल्लवी जोशी आणि वामन केंद्रे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतून या नियुक्त्यांची विशेष चर्चा होत आहे.
दरम्यान, यापूर्वीच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, माजी फुटबॉलपटू मिहिर भुतिया, अभिनेत्री गौतमी तडिमल्ला, वाणी त्रिपाठी टिक्कू, जीविता राजशेखर आणि दिग्दर्शक नरेश चंद्र लाल यांच्यासह वामन केंद्रे आणि रमेश पतंगे यांचा समावेश होता.
नव्या कार्यकारिणीत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा, अभिनेता सुनील शेट्टी आणि पंकज त्रिपाठी यांचा नव्या मंडळात समावेश करण्यात आला आहे.
सिनेमॅटोग्राफ कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत सीबीएफसीच्या मंडळाची तीन वर्षांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत पुनर्रचना करण्यात आली आहे. मंडळाची यापूर्वीची औपचारिक पुनर्रचना ऑगस्ट २०१७ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल सात वर्षांनी सीबीएफसीची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नव्या कार्यकारणीतील १८ सदस्यांची नावे
- मनोज जोशी
- सुनील शेट्टी
- प्रीती झिंटा
- पंकज त्रिपाठी
- प्रोसेनजीत चॅटर्जी
- प्रियदर्शन
- संगीतकार रिकी केज
- विनोद अनुपम
- अभिषेक जैन
- हंसराज हंस
- सुप्रिया यारलागड्डा
- यतींद्र मिश्रा
- रुपाली गांगुली
- नीला माधब पांडा
- पल्लवी जोशी
- निशिगंधा वाड
- वामन केंद्रे
- रमेश पतंगे
सेन्सार बोर्डाचे काम
कोणताही भारतीय चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित होणे आवश्यक असते. सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही चित्रपटाला अधिकृतपणे मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करता येत नाही.
चित्रपटाचे परीक्षण करून त्याच्या आशय आणि विषयानुसार योग्य प्रमाणपत्र देणे हे सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख काम आहे. चित्रपटाला ‘U’, ‘UA’, ‘A’ किंवा इतर लागू श्रेणीतील प्रमाणपत्र दिले जाते.
तसेच चित्रपटातील आक्षेपार्ह किंवा नियमांचे उल्लंघन करणारे दृश्य, संवाद अथवा इतर आशयामध्ये बदल करण्याचे निर्देशही मंडळाकडून दिले जाऊ शकतात. चित्रपटाच्या निर्मात्यांना हे निर्देश आणि प्रमाणपत्राच्या अटींचे पालन करणे आवश्यक असते.
Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा प्रसाद घेण्यास नकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल





