नवीन नवरदेव गादीवर बसण्यासाठी तयार; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

नागपूर – १० तारखेच्या निकालानंतर नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या बोहल्यावर बसेल. मुख्यमंत्रिपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेले आहेत. अनेकांनी कपडे शिवून ठेवले आहेत, असा दावा विश्वास विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मागील दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. २० डिसेंबरला याप्रकरणावर अंतिम सुनावणी झाली. त्यानंतर आता या प्रकरणाचा निकाल १० जानेवारी २०२४ रोजी लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री बदलाबाबत मोठा दावा केला आहे.
वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही निवडणुकीची तयारी करत आहोत. जागावाटपासाठी उद्या दिल्लीत महाराष्ट्र राज्याची बैठक आहे. आमच्या सर्व्हे नुसार आम्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ३० पेक्षा अधिक जागा जिंकू.
विदर्भात आज झालेल्या पक्षाच्या स्थापना दिवसाचा नक्कीच फायदा होईल व विदर्भातून काँग्रेसला साथ मिळेल. विदर्भातून आम्ही दहा पैकी सात जागा जिंकू, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.





