Nevasa : नेवासा हादरला! गोधेगावात बिबट्याचा थरार; झोपेत असलेल्या शेतमजुराला ओढून नेले
Nevasa : गोधेगाव येथील काशिनाथ औटे यांच्या घराशेजारील शेडमध्ये शेती कामगार सुरेश अहिरे हे झोपले होते. गुरुवार (दि.१५) ऑक्टोबरच्या रात्री अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जवळच असलेल्या शेतात ओढत नेल्याची हृदयद्रावक घटना घडली.

नेवासे : नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. शेळ्या, कुत्र्यांवर हल्ला करणारा बिबट्या आता थेट माणसावर हल्ला करू लागल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमके काय घडले?
गोधेगाव येथील काशिनाथ औटे यांच्या घराशेजारील शेडमध्ये शेती कामगार सुरेश अहिरे हे झोपले होते. गुरुवार (दि.१५) ऑक्टोबरच्या रात्री अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जवळच असलेल्या शेतात ओढत नेल्याची हृदयद्रावक घटना घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश अहिरे दिसले नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली त्यावेळी त्यांची चप्पल जवळच्या कापसाच्या शेतात पडलेली आढळली. त्यामुळे बिबट्याने हल्ला केल्याचा संशय बळावला ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन शोध घेत असतानाच शेजारील उसाच्या शेतात सुरेश अहिरे यांचा पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
परिसरात दहशत
आजपर्यंत गोधेगाव परिसरात बिबट्याने शेळ्या,कुत्रे फस्त केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत,मात्र बिबट्याने थेट माणसावर हल्ला करून फस्त करण्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाण्यासही शेतकरी घाबरत आहेत या नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी गोधेगावसह परिसरातील ग्रामस्थांमधून जोर धरू लागली आहे.





