Nevasa traffic : नेवासा फाट्यावर वाहतुकीचा खोळंबा; राजमुद्रा चौक ते आंबेडकर चौकापर्यंत वाहनांच्या रांगा
Nevasa traffic : नेवासे फाटा येथे राजमुद्रा चौक ते आंबेडकर चौकादरम्यान वाहतुकीचा खोळंबा. वाहनांच्या गर्दीमुळे प्रवासी त्रस्त; वाहतूक नियोजनाची नागरिकांची मागणी.

Nevasa traffic : अहिल्यानगर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासे फाटा येथे रविवारी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. राजमुद्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सणासुदीच्या सुट्ट्यांमुळे वाढलेल्या वाहनांच्या गर्दीचा फटका प्रवाशांना बसला.
कार, जीप, बस, ट्रक, टेम्पो आणि दुचाकींची गर्दी झाल्याने वाहनांची हालचाल मंदावली. रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने, हॉटेलसमोरील गर्दी आणि अतिक्रमणांमुळे कोंडीत आणखी भर पडली. नगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन्ही दिशांनी जाणारे प्रवासी तासन्तास अडकून पडले.
दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत असल्याची तक्रार वाहनधारकांनी केली. दोन्ही चौकांत पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने वाहतुकीचे नियोजन विस्कळीत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चौकांत अतिरिक्त पोलीस नेमावेत, अतिक्रमणे हटवावीत आणि बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





