प्रभात वृत्तसेवा नेवासे – नेवासा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना नव्या कार्यालयासाठी शासनाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.तालुक्यात एकूण 115 ग्रामपंचायती असून, त्यापैकी सुमारे 10 ते 12 ग्रामपंचायतींना अद्याप स्वतंत्र कार्यालय नव्हते. या सर्व ग्रामपंचायतींना कार्यालय निर्मितीसाठी आपण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने मागणी केली होती, असे आमदार लंघे यांनी सांगितले. या पाठपुराव्याला यश मिळत पहिल्या टप्प्यात शिंगवे तुकाई, वाकडी, पाचुंदा या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपये, तर शहापूर व नजीक चिंचोली या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २० लाख रुपये असे एकूण १ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.यापूर्वी कुकाणा व जेऊर हैबत्ती या ग्रामपंचायतींनाही प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्यात आला होता. ग्रामपंचायत स्तरावर दैनंदिन कामकाज सुकर व्हावे, नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांना सुलभ वातावरण मिळावे, यादृष्टीने नवीन कार्यालयांची उभारणी अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार लंघे यांनी नमूद केले.