Nevasa News | पुरुषांना मोफत, महिलांना शुल्क ; नेवासा नगरपंचायतीचा दुजाभाव

प्रभात वृत्तसेवा
नेवासा ( राजेंद्र वाघमारे ) – नेवासा शहरात नगरपंचायतीकडून महिलांसाठी एकही स्वच्छतागृह बांधण्यात आलेले नसल्यामुळे महिला वर्गांचे मोठे हाल होत आहे. असे असताना नेवासा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशी महिलांच्या सोयीसाठी एकमेव स्वच्छतागृहामध्ये असून, या स्वच्छतागृहात चक्क लघुशंकेसाठी येणाऱ्या महिलांकडून प्रत्येकी पाच रुपये उकळले जात असल्याच्या गंभीर तक्रारी महिला वर्गातून केल्या जात आहे.
पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी पैसे घेतले जात नसतानाच महिलांची नेमकी अडवणूक का आणि कशासाठी? असा संतप्त असालही आता महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे.नेवासा शहरात नगरपंचायत स्थापना झाल्यापासून अद्यापपर्यंतही शहरात महिलांसाठी एकाही स्वच्छतागृहाची व्यवस्था शहरात करण्यात आलेली नाही. वर्दळीच्या ठिकाणी महिलावर्ग लघुशंकेसाठी उघड्यावर बसू शकत नसल्याचे हेरून नेवासा बसस्थानकात प्रवाशी महिलांची अडवणूक केली जात असल्याच्या आरोपही आता उघडपणे महिला वर्गातून केला जात आहे.
नेवासा शहरात मोठी लोकसंख्या असतानाही मुलभूत सुविधा नेवासेकरांना देण्यात नगरपंचायत सपशेल अयशस्वी ठरली जात असल्याचा आरोप महिला वर्गातून केला जात आहे. नेवासा शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या या स्वच्छतागृहात पुरुषांना मोफत तर महिलांकडून लघशंकेसाठी प्रत्येकी पाच रुपये उकळले जात असल्यामुळे महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.
मोफत स्वच्छतागृहाची व्यवस्था करा..
नेवासा शहरात बाहेरगावातून अनेक विद्यार्थीनी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी बसने प्रवास करत असतात. या विद्यार्थींनींकडे पैसे नसल्यामुळे चक्क त्यांना नेवासा बसस्थानकाच्या स्वच्छतागृहात संबंधितांकडून प्रवेश दिला जात नसल्यामुळे याची चौकशी करून महिला व विद्यार्थींनींना मोफत स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मागणी महिला वर्गातून केली जात आहे.





