नेवास्यात DySP खाडेंचा दणका: अवैध धंद्यांना कुलूप, ‘त्या’ पान टपरीही बंद

नेवासा – नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी रुजू होताच अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू केली आहे. मटका, जुगार, मावा, गुटखा विक्रीवर त्यांनी कायदेशीर बडगा उगारला, ज्यामुळे अवैध धंदे चालकांनी धसका घेतला आहे. अनेकांनी पान टपऱ्या बंद करून गाशा गुंडाळला, तर मुंबई-कल्याण मटका जुगाराचा खेळही थांबला आहे. खाडे यांच्या कठोर धोरणामुळे नेवास्यातील गल्लीतील स्वयंघोषित दादा आणि गुंडांचीही हवा खड्ड्यात गेली आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यभूमीत खाडे यांनी कायदा आणि शिस्तीचा नवा पायंडा पाडला. अवैध धंदे बंद झाल्याने मावा आणि गोवा मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे जनतेतून त्यांचे कौतुक होत असताना, अवैध धंदे चालक ‘साहेब कधी जाणार?’ असा प्रश्न विचारत आहेत. वारकरी संप्रदायानेही खाडे यांच्या कार्यशैलीचे स्वागत केले आहे. अल्पावधीतच त्यांच्या दणकेबाज कारवाईमुळे नेवास्यात सर्वत्र पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचीच चर्चा आहे.


