नेवासा: सिंघम संतोष खाडेंचा नेवास्यात दबदबा; अवैध धंद्यांना लावले कुलूप

नेवासा – नेवासा तालुक्यात प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक संतोष खाडे यांनी नुकताच नेवासा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आणि त्यांच्या धडाकेबाज कारवायांनी खाकी वर्दीचा रुबाब पुन्हा वाढला आहे. ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे खाडे यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू केली. त्यांनी पोलीस ठाण्यात बैठक घेऊन सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे पोलीस कर्मचारीही सतर्क झाले. परिणामी, अवैध धंदे चालवणाऱ्यांनी स्वत:हून व्यवसाय बंद केले आणि त्यांच्यात खाडे ‘साहेब’ कधी जाणार, याची चर्चा सुरू झाली.
खाडे यांच्या आगमनाने धुमस्टाईल गाड्यांवर फिरणारे ‘भाई’ गप्प बसले, तर जुगार, वेश्या व्यवसाय आणि अवैध वाळू वाहतुकीवरही कारवाई सुरू झाली. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर फेरफटका मारत त्यांनी कडक पावले उचलली, ज्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत पसरली. संत ज्ञानेश्वरांनी पवित्र केलेल्या नेवासा शहराला धार्मिक ओळख असली, तरी पोलीस दप्तरी ते ‘संवेदनशील’ म्हणून नोंदलेले आहे. मात्र, खाडे यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या पाच-सहा दिवसांत शांतता प्रस्थापित झाली आणि अवैध धंदे बंद पडले. या नव्या दमाच्या अधिकाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





