ऊसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंत; DySP संतोष खाडेंची प्रेरणादायी यशोगाथा

नेवासा (राजेंद्र वाघमारे) – गेल्या ३०-३५ वर्षांपासून ऊसाच्या फडात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या आई-वडिलांनी आपल्या मुलाने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, अशी स्वप्ने मनी बाळगली. हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून मुलाच्या शिक्षणासाठी ऊसतोडणीचे कठोर काम करणाऱ्या या पालकांच्या मेहनतीला अखेर फळ मिळाले. त्यांच्या मुलाने, संतोष खाडे याने, आई-वडिलांचे जनावरांसारखे हाल थांबवण्याचा संकल्प केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपअधीक्षक पदावर विराजमान होण्याचा मान मिळवला. राज्याच्या सर्वसाधारण यादीत १६ वा आणि एनटीडी संवर्गातून पहिला क्रमांक पटकावणाऱ्या संतोष यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आई-वडिलांच्या हातातील कोयता खाली ठेवला आणि गृहखात्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून दाखल झाले. ‘दैनिक प्रभात’ने या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाशी साधलेला हा खास संवाद…
कष्टकरी कुटुंबातून थेट पोलीस उपअधीक्षकपदापर्यंत
संतोष खाडे मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगांव घाट येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई-वडील गेल्या ३०-३५ वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करत होते. या वर्षी मात्र, संतोषच्या यशामुळे त्यांच्या हातातील कोयता अखेर खाली पडला. नुकतेच त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. रुजू होताच त्यांनी धडाकेबाज कारवायांना सुरुवात केली आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून आपली छाप पाडली.
‘दैनिक प्रभात’शी बोलताना संतोष म्हणाले, “माझ्या आई-वडिलांनी ३०-३५ वर्षे सतत कोयत्याने ऊस तोडला. पण माझ्या या यशामुळे तो पहिल्यांदाच खाली पडला आहे. हे यश माझे नसून माझ्या आई-वडिलांच्याच कष्टाचे फळ आहे.” पुढे ते म्हणाले, “जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एका सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाने स्पर्धा परीक्षेचे क्षेत्र निवडले. इथे वशिला किंवा पैसा नाही, फक्त अभ्यासच कामाला येतो. मी माझ्या आई-वडिलांचे पुण्याई आणि त्यांच्या कष्टाच्या बळावर ऊसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहोचलो.”
आई-वडिलांच्या कष्टाची प्रेरणा
संतोष यांनी आपल्या संघर्षाची कहाणी सांगताना भावूक क्षण शब्दांत मांडले. ते म्हणाले, “माझे वडील पायाने अपंग आहेत. ऊसाची मोळी खांद्यावर घेऊन गाडीत टाकताना सरीत पाय घसरून ते खाली पडायचे. मग त्यांच्या अंगावर ऊसाची मोळी पडायची. ही वेदना माझ्या आईला सहन होत नव्हती. म्हणून वडील गाडीत उभे राहायचे आणि माझी अशक्त आई ऊसाची मोळी घेऊन गाडी भरायची. त्यामुळे वडिलांच्या टाचांना आणि आईच्या खांद्यावर आजही जखमा दिसतात. हे सगळं पाहून मी ठरवलं की, आधी माझ्या आई-वडिलांचा कोयता बंद करायचा. त्यासाठी मी स्पर्धा परीक्षेची वाट निवडली आणि अभ्यासाला स्वतःला झोकून दिलं. आज माझ्या यशामुळे त्यांचे हाल थांबले आहेत. खरा मानकरी मी नाही, तर माझे आई-वडील आहेत.”
तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश
‘दैनिक प्रभात’शी संवाद साधताना संतोष यांनी तरुणांना प्रेरक संदेश दिला. ते म्हणाले, “स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना लक्ष विचलित होऊ देऊ नका. फक्त अभ्यासावर जीव ओवाळून टाका. यश लांब नाही. मी स्पर्धा परीक्षेला ‘देव’ मानतो. इथे वशिला किंवा पैशाची गरज नाही, फक्त बुद्धिमत्ता आणि मेहनत कामाला येते. याच जोरावर यशाचे शिखर गाठता येते.”
ऊसतोडणीपासून धडाकेबाज कारवाईपर्यंत
नेवासा पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून संतोष खाडे यांनी एकापाठोपाठ एक धडाकेबाज कारवाया करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या या यशाने राज्यातील तरुणांसमोर एक आदर्श उभा राहिला आहे. ऊसाच्या फडातून थेट पोलीस उपअधीक्षकपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे.





