नेतान्याहू यांनी मान्य केली हवाई हल्ल्याची चूक; पॅलेस्टिनी विस्थापितांच्या तंबूवरील हल्ल्यात ४५ ठार

तेल अविव – रफाह शहरावर अस्रायली हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्याची चूक इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी मान्य केली आहे. या हल्ल्यामुळे विस्थापितांच्या तंबूंना आग लाग लागली होती. त्यामध्ये ४५ पॅलेस्टिनी विस्थापितांचा मृत्यू झाला होता.
इस्रायलच्या या हल्ल्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मोठी टीका झाली होती. हमासविरोधात इस्रायलने सुरू केलेल्या युद्धापासून होत असलेल्या टीकेमध्ये या हल्ल्यामुळे भरच पडली आहे.हल्ल्यामध्ये सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे आता इस्रायलचे मित्र देश देखील टीका करायला लागले आहेत.
जागतिक न्यायालयाने इस्रायलला रफाहवरील कारवाई थाबवण्याचे आदेश दिले आहेत. तरी, आपल्याकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केले जात असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
नेतान्याहू यांनी आपल्या चूकीबद्दल फारसा तपशील दिला नाही. कारवाईमुळे सामान्य नागरिकांना काही त्रास होऊ नये, याची खबरदारी घेतल्यानंतरही एक चूक झाली आहे, असे नेतान्याहू यांनी इस्रायली संसदेत बोलताना सांगितले.
रविवारी रात्री करण्यात आलेला हा हवाई हल्ला हमासच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी केला गेला होता आणि या हल्ल्यात हमासचे दोन वरिष्ठ दहशतवादी मारले गेले होते, असे इस्रायली सैन्याने सुरुवातीला म्हटले होते. मात्र पॅलेस्टिनींच्या तंबूंवर हल्ला झाला आणि त्यातून आग लागल्याचे उघड झाल्यावर इस्रायलने या प्रकाराची चौकशी सुरू केल्याचे सांगितले.
या हल्ल्यामुळे या युद्धात मरण पावणाऱ्या पॅलेस्टिनींची संख्या ३५ हजारांवर पोचली आहे, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.





