“नेट’ परीक्षा जुलै, ऑगस्टमध्ये

पुणे : विद्यापीठ व महाविद्यालयात सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेल्या यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आले आहे. ह्या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होत आहे, अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रो. जगदीश कुमार यांनी सोमवारी ट्विट करून दिली.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) नेट परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहे. एनटीएमार्फत वर्षातून दोन वेळा यूजीसी नेट परीक्षा घेतली जाते. मात्र, करोनामुळे डिसेंबर 2021 ची नेट परीक्षा होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे जून 2022 मध्येही या परीक्षा घेण्याचे प्रस्तावित होते. आता या दोन्ही परीक्षा एकाच वेळी जुलै व ऑगस्टमध्ये होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नेट परीक्षा दि. 8, 9, 11 आणि 12 जुलै आणि दि.12 ते 14 ऑगस्ट 2022 रोजी परीक्षा होणार आहेत. तपशीलवार वेळापत्रक “एनटीए’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती जगदीश कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, एकाच वेळी नेट परीक्षा दोन टप्प्यात होत आहे.




