Pune : मिसिंग लिंक आॉगस्टमध्ये होणार खुली

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकची कामे वेगाने सुरु आहेत. सद्यस्थितीत आशिया खंडातील सर्वाधिक उंच म्हणजे १३० मीटर उंचीच्या केबल ब्रिजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबईकडून पुण्याकडे येताना दीड किलोमीटर लांबीचे दोन बोगदे, तर पुण्याकडून मुंबईकडे जाताना सर्वात मोठ्या लांबीचा, म्हणजे सुमारे नऊ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे आहेत.
या दोन्ही बोगद्याची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा मिसिंग लिंक प्रकल्प वाहतुकीसाठी खुला करण्याचा रस्ते विकास महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे पुणे मुंबई हे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. तर प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होणार आहे. लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात आणि पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते.
या भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यात बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतले होते. या प्रकल्पामुळे बोर घाटातील ६ किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात पूर्ण होणार अशी घोषणा केली आहे. यावेळी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पांची सद्यस्थितीबाबत माहिती दिली. या प्रकल्पातंर्गत महामार्गावर दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नविन रस्ता बांधण्याचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामध्ये आशिया खंडातील सार्वधिक म्हणजे २३.५ मीटर इतक्या रुंदीचे दोन बोगदे आहेत. या दोन्ही बोगद्याची कामे पूर्ण झाली आहेत. तर दरी भागात बांधण्यात येणाऱ्या केबल ब्रिजची लांबी ६४५ मीटर आणि उंची १८१ मीटर इतकी आहे. या दरीवरील पुलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील तीन -चार महिन्यात मिसिंग लिंकचे काम पूर्ण होईल, असा दावा एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.





