एका षटकात 6 बळी, ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास

काठमांडू – नेपाळ प्रो लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत मलेशिया क्लब इलेव्हन व पुश स्पोर्टस दिल्ली या सामन्यात एक विक्रम घडला. मलेशिया संघाकडून खेळणारा विरनदीप सिंहने डावातील आपल्या अखेरच्या षटकात सलग सहा चेंडूंवर सहा बळी मिळवून दिले. यातील पाच बळी त्याने घेतले तर एक फलंदाज धावबाद झाला व अखेरच्या षटकातील सहा चेंडूंवर सलग सहा गडी बाद होण्याची ही पहिलीच घटना ठरली.
या सामन्यात विनरदीपने पुश स्पोर्टस् दिल्लीच्या डावात अखेरच्या 20 व्या षटकात तब्बल पाच फलंदाज बाद झाले. याच षटकात विरनदीपने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर त्याने मृगांक पाठकला बाद केले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इशान पांडे धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर अनिंदो नहारायचा त्याने त्रिफळा उडवला.
चौथ्या चेंडूवर विशेष सरोहाला बाद केले. पाचव्या चेंडूवर जतीन सिंघल झेलबाद झाला. षटकातील अखेरच्या चेंडूवर स्पर्शचा विनरदीपने त्रिफळा उडवला. पुश स्पोर्टसने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 132 धावा केल्या. त्यानंतर मलेशिया क्लब इलेव्हनने हे आव्हान 17.3 षटकात 3 गडी गमावून पूर्ण केले.




