नेपाळमध्ये पुराचा कहर ! आतापर्यंत 170 लोकांचा मृत्यू , 42 बेपत्ता ; शाळा, महाविद्यालये बंद

Nepal Flood। भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी पूर आणि भूस्खलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 170 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 42 जण बेपत्ता आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर काठमांडूची मुख्य नदी बागमती धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहे. परिस्थिती पाहता प्रशासनाने तीन दिवस सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत.
पुरात अडकलेल्या लोकांची सुटका Nepal Flood।
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषीराम पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘देशात पुरामुळे झालेल्या घटनांमध्ये १११ जण जखमी झाले आहेत. पोखरेल म्हणाले की, सर्व सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे’. ते म्हणाले की, ‘नेपाळी लष्कराने देशभरात अडकलेल्या 162 लोकांना एअरलिफ्ट केले आहे. याशिवाय नेपाळी लष्कर, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी बाधित भागातून ४,००० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सुटका करण्यात आलेल्या लोकांना अन्नधान्यासह सर्व आवश्यक मदत साहित्य वाटप करण्यात आले आहे.
भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत
ऋषीराम पोखरेल म्हणाले की, ‘भूस्खलन आणि पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्ग विस्कळीत होत आहेत. त्यामुळे शेकडो लोक येथे अडकून पडले आहेत. अडवलेले राष्ट्रीय महामार्ग खुले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय काठमांडूला इतर जिल्ह्यांशी जोडणारा मुख्य भूमार्ग असलेल्या त्रिभुवन महामार्गावर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरामुळे नेपाळमध्ये किमान 322 घरे आणि 16 पुलांचे नुकसान झाले आहे.
‘इतका विनाशकारी पूर कधीच पाहिलं नाही’ Nepal Flood।
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुराने हाहाकार माजवला आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘त्यांनी काठमांडू खोऱ्यात 40-45 वर्षांत इतका विनाशकारी पूर आणि पाणी साचलेले पाहिले नाही. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) चे हवामान आणि पर्यावरण तज्ज्ञ अरुण भक्त श्रेष्ठ म्हणाले, ‘काठमांडूमध्ये मी याआधी कधीच इतक्या प्रमाणात पूर पाहिला नाही’.
वातावरणातील बदलामुळे विध्वंस!
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हवामानातील बदलामुळे संपूर्ण आशियामध्ये पावसाचे प्रमाण आणि वेळ बदलत आहे, परंतु पुराच्या वाढत्या प्रभावाचे एक प्रमुख कारण म्हणजे अनियोजित बांधकामासारख्या मानवी क्रियाकलाप. पूर आणि भूस्खलनामुळे देशातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक महामार्ग आणि रस्ते विस्कळीत झाले आहेत, शेकडो घरे आणि पुलांचे नुकसान झाले आहे आणि शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत.
आयसीएमओडीने शनिवारी प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, शुक्रवार आणि शनिवारी पूर्व आणि मध्य नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर काठमांडूची मुख्य नदी बागमती धोक्याच्या चिन्हावरून वाहत होती. त्यात म्हटले आहे की बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाची स्थिती आणि मान्सूनमुळे शनिवारी असाधारणपणे जोरदार पाऊस झाला.
बसवर दरड कोसळली
शनिवारी काठमांडूच्या सीमेला लागून असलेल्या धाडिंग जिल्ह्यात भूस्खलनात बस गाडल्याने किमान 19 जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भक्तपूर शहरात दरड कोसळल्याने घर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मकवानपूर येथील ‘ऑल इंडिया नेपाळ असोसिएशन’ संचालित प्रशिक्षण केंद्रात भूस्खलनाच्या घटनेत सहा फुटबॉल खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला आणि इतर पुराच्या पाण्यात वाहून गेले. दरम्यान, मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला.





