Nepal-China : नेपाळ-चीनमध्ये ९ मुद्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या; गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरही झाली चर्चा
Nepal-China – नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या चीन दौऱ्यात आज दोन्ही देशात ९ मुद्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ओली यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा, व्यापार आणि पर्यटनासह अन्य विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.
याशिवाय , गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन, लोकांशी संपर्क आणि गरिबी निर्मूलन आदी विषयांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. त्यापूर्वी ओली यांनी चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली होती.
जिनपिंग यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर ९ मुद्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात काही सामंजस्य करारदेखील आहेत. या करारांमध्ये काठमांडूजवळच्या तोखा-छाहारी बोगद्याचे बांधकाम, दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे, काठमांडूतील बसंतपूरमधील ९ मजली राजवाड्याचे नुतनीकरणाशी संबंधित करारांचा समावेश आहे.
तसेच नेपाळमधून मांसाहाराची चीनमध्ये निर्यात, बांधकामासाठी चीनच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य, चिनी भाषेतील शिक्षण आणि दोन्ही देशांमधील टिव्ही वाहिन्यांमधील सहकार्याच्या करारांवरही स्वाक्षऱ्या झाल्या, असेही नेपाळच्या प्रवक्त्याने सांगितले.





