नेहा धुपियाची तब्येत बिघडली; सेटवरच अचानक झाली बेशुद्ध

Neha Dhupia | प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘एमटीव्ही रोडीज XX’ चा नवा सीझन सुरू झाला आहे. मात्र या शोच्या शुटींगदरम्यान अभिनेत्री नेहा धुपिया अचानक चक्कर येऊन पडली. सध्या या शोच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात नेहाची तब्येत बिघडल्याचे दिसत आहे. नेहाची अचानक तब्येत बिघडल्याने चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मात्र नेहा धुपियाने शोचे शूटिंग रद्द न करता फक्त काही वेळासाठी ब्रेक घेतला आणि पुन्हा काम सुरू केले. शोच्या प्रोमोमध्ये ही घटना दाखवण्यात आल्याने इंटरनेटवरही त्याची जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये दिसत आहे की, नेहा धुपियाला सेटवर चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. मात्र, थोड्या वेळात ती उभी राहिली. तिने म्हटलं की, ‘मी तंदुरुस्त आहे, ठीक आहे आणि MTV रोडीज XX मध्ये लीडर म्हणून काम करण्यास तयार आहे’. नेहा आपल्या कामात खूप ॲक्टिव्ह असल्याचे याद्वारे पुन्हा पाहायला मिळाले.
या घटनेबद्दल बोलताना नेहा धुपियाने सांगितलं की, ‘ही एक किरकोळ आरोग्य समस्या होती, पण मी पुन्हा माझ्या पायावर उभी आहे, नेहमीसारखीच प्रेरित आणि उत्साहित आहे. रोडीज नेहमीच मर्यादा ओलांडण्याबद्दल असते आणि हा प्रवास मला प्रत्येक अडथळ्यावर मात करण्यासाठी प्रेरित करतो. मला कोणीही अडवणार नाही’.
दरम्यान, सध्या नेहा तिच्या कामामुळे खूप व्यस्त असलेली पाहायला मिळाली. कामानिमित्त नेहाला अनेक वेळा मुलांपासून दूर परदेशात जावे लागते. त्यामुळे बदलते वातावरण, धावपळ, बाहेरचं खाणे यामुळे तिची तब्येत बिघडल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:
‘कायदा-सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया’, अजित पवार यांचे प्रतिपादन





