Neha Bora : विरोधाचा आवाज दाबून टाकणारी शांतता अमान्य; याचिका फेटाळल्यानंतर नेहा बोरा यांची आक्रमक भूमिका
विरोधाचा आवाज दाबून टाकणारी शांतता आम्हाला अमान्य आहे, अशी आक्रमक भूमिका ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा (Neha Bora) यांनी घेतली.

Neha Bora : शांतता बंधपत्रावर स्वाक्षरी करणे म्हणजे एक प्रकारे आंदोलन करण्याचा आणि लोकशाही मार्गाने विरोध व्यक्त करण्याचा मूलभूत अधिकारांच्या विरोधात गेल्यासारखं आहे. आम्ही अशा कोणत्याही दस्तऐवजावर स्वाक्षरी करणार नाही. विरोधाचा आवाज दाबून टाकणारी शांतता आम्हाला अमान्य आहे, अशी आक्रमक भूमिका ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा (Neha Bora) यांनी घेतली.
दिल्ली उच्च न्यायालयाने नेहा बोरा यांची आव्हान याचिका फेटाळल्यानंतर शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला. नेहा बोरा (Neha Bora) म्हणाल्या, एका बाजुला संविधान आपल्याला शांततेने निदर्शने करण्याचा अधिकार देतो. दुसऱ्या बाजुला शांतता बंधपत्र आहे. सरकारविरोधात चिंता व्यक्त करणे हा शांततेला धोका कसा मानला जाऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
जर आपण सरकारला प्रश्नच विचारले नाहीत, तर आपण कोणाची शांतता राखत आहोत? सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारण्याचा व मत व्यक्त करण्याचा हक्क हा लोकशाहीचा पाया आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील लढ्याला कोणतीही दिशा मिळाली तरी, मतभेद व्यक्त करण्याच्या हक्काला शांततेसाठी धोका ठरवून तो लढला जाऊ नये, असे बोरा यांनी ठामपणे सांगितले.
उच्च न्यायालयाने आम्हाला विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आम्ही त्या प्रक्रियेत सहभागी होऊ. शांतता ही केवळ सरकारसाठी नसून सामान्य नागरिकांसाठीही असली पाहिजे, असे सांगत लोकशाही मार्गाने विरोध व्यक्त करण्याचा अधिकार यापुढेही बजावत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी (Neha Bora) व्यक्त केला.






