PCMC : स्वीकृतसह क्षेत्रीय समिती सदस्य निवडीकडे कानाडोळा
PCMC: भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - पक्षनेतृत्वाचे दुर्लक्ष

पिंपरी – महापालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा विषय सत्ताधारी भाजपकडून वारंवार पुढे ढकलला जात आहे. तर दुसरीकडे, दहा क्षेत्रीय समित्यांमधील ३० स्वीकृत सदस्यांच्या निवडीही रखडल्या आहेत.
क्षेत्रीय समित्यांच्या अध्यक्षांच्या निवडी होऊन तीन महिने उलटले, तरी सदस्य निवडीला मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांची घालमेल वाढली असून, सत्ताधारी भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
महापालिकेतील आठ क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढवून भाजपने दहा क्षेत्रीय कार्यालयांची रचना केली. त्यानुसार १३ जुलै रोजी दहा क्षेत्रीय समित्यांच्या अध्यक्षांची निवड झाली. सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागली. त्यानंतर महिनाभरात क्षेत्रीय समित्यांवरील स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणे अपेक्षित होते.
प्रत्येक समितीवर तीन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाते. दहा समित्यांमधून एकूण ३० जणांना संधी मिळणार आहे. पदाधिकारी आणि महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांकडून लवकरच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात असले, तरी प्रत्यक्षात निर्णय होत नसल्याने अंतर्गत नाराजी वाढत चालली आहे.
भाजपकडे स्वीकृत नगरसेवकपदासाठी दीडशेहून अधिक इच्छुक आहेत. माजी नगरसेवक, निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, उमेदवारीतून माघार घेतलेले इच्छुक, पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, संस्थाचालक आणि निष्ठावंत कार्यकर्ते या पदासाठी प्रयत्नशील आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल आणि कामगार संघटनांमधील पदाधिकाऱ्यांचाही या पदासाठी दावा असल्याचे सांगितले जाते. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना क्षेत्रीय समित्यांवरील सदस्यत्वाची संधी दिली जाऊ शकते, असा दावा पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रियेसाठी उशीर होत असल्याने नाराजांची संख्या वाढत आहे.
दहा महिन्यांचा कार्यकाळ वाया
नवनिर्वाचित नगरसेवकांचा कारभार ६ फेब्रुवारीपासून सुरू झाला. त्याचवेळी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी झाल्या असत्या, तर संबंधितांना दहा महिने कार्यकाळ मिळाला असता.
त्यातच इच्छुक जास्त असल्याने सत्ताधारी भाजपाने स्वीकृतसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला आणला आहे. अशा परिस्थितीत दहा महिने वाया गेल्याने पक्ष कसा ताळमेळ बसवणार याकडे लक्ष लागले आहे.
भाजपला सात, तर राष्ट्रवादीला तीन जागा
महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे सात, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे तीन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याच्या तिन्ही जागांसाठी नावे दिली आहेत.
या नावांसह निवडीचा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर पडून आहे. काही महिन्यांपासून भाजपकडून स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी लांबणीवर टाकल्या जात आहेत. त्यातच क्षेत्रीय समित्यांवरील स्वीकृत सदस्यांच्या निवडीही रखडल्याने इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे.
Satara: सातारा मेडिकल कॉलेजसाठी १३ कोटी ५० लाख निधी मंजूर; ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा





