Neetu Kapoor : “ऋषि कपूर यांच्या वाढदिवशी नीतू कपूर भावुक, सोशल मीडियावर शेअर केली खास आठवण”

Neetu Kapoor : आज, ४ सप्टेंबर हा दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांचा जन्मदिन. आपल्या खास अंदाज आणि जबरदस्त अभिनयाने ऋषि कपूर यांनी चाहत्यांच्या मनात कायमची जागा निर्माण केली. त्यांच्या या खास दिवसानिमित्त पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी त्यांना सोशल मीडियावर आठवत एक भावनिक पोस्ट शेअर केली.
नीतू कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ऋषि कपूर यांचा ‘खुल्लम-खुल्ला विद ऋषि कपूर’ या लाईव्ह शोमधील एक व्हिडीओ टाकला आहे. या व्हिडीओमध्ये ऋषींचा मजेदार, विनोदी अंदाज पाहायला मिळतो. त्याचसोबत रणबीर कपूरपासून ते बॉलिवूडमधील अनेक दिग्गज त्यांचं कौतुक करताना दिसले. व्हिडीओ शेअर करताना नीतू यांनी कॅप्शनमध्ये लिहिले “आपण नेहमी आमच्या हृदयात राहाल, वाढदिवसाच्या शुभेच्छा”.
नीतू यांच्या या पोस्टवर सेलेब्ससह अनेक फॅन्सनी प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री सादिया खतीब, उर्मिला मातोंडकर आणि चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे यांनी लाल हृदयाचे इमोजी शेअर करून ऋषींना आठवले. चाहत्यांनीही ऋषींच्या आठवणींना उजाळा दिला. एका चाहत्याने लिहिले, “ऋषि कपूर सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपण माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहात”. दुसऱ्याने म्हटले, “आपली खूप आठवण येते”, तर आणखी एकाने लिहिले, “आपण एक महान अभिनेता होता, पण त्याहूनही महान माणूस होता”.
ऋषि कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी मुंबईत झाला. त्यांनी ‘बॉबी’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘चांदनी’, ‘दीवाना’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांचे निधन ३० एप्रिल २०२० रोजी मुंबईतील रुग्णालयात झाले. रक्ताच्या कॅन्सरशी (ल्यूकेमिया) दीर्घ लढा दिल्यानंतर त्यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त नीतू कपूर यांचा भावनिक संदेश पाहून चाहत्यांच्या डोळ्यांतही पाणी आले. ऋषि कपूर सदैव त्यांच्या अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे लोकांच्या आठवणीत कायम जिवंत राहतील.





