NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! शिवराज मोटेगावकरसह सर्व १४ आरोपींवर आरोप निश्चित
NEET Paper Leak : देशभरातील वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक न्यायालयाने शनिवारी मोठा निर्णय दिला आहे.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीच्या फास्ट-ट्रॅक कोर्टात शिवराज मोटेगावकरसह सर्व 14 आरोपींवर शनिवारी औपचारिकपणे आरोप निश्चित करण्यात आले. राऊज अव्हेन्यू कोर्टातील विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर सर्व आरोपींनी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत खटला लढवण्याचा निर्णय घेतला. आता आरोप निश्चित झाल्याने खटल्याला गती मिळणार असून, पुढील सुनावणी २५ नोव्हेंबरपासून दररोज घेण्यात येणार आहे. (NEET Paper Leak)
नीट पेपरफुटी प्रकरणी सर्व आरोपींवर गुन्हेगारी कट, फसवणूक, विश्वासघात, पुरावे नष्ट करणे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अयोग्य मार्गांचा प्रतिबंध) कायदा 2024 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात सीबीआयने दोन वेगवेगळी आरोपपत्र दाखल केली आहेत. (NEET Paper Leak)
पहिले आरोपपत्र 28 जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यात 13 जणांची नावे होती. यामध्ये एनटीएशी संबंधित तीन विषय तज्ज्ञ, कोचिंग संस्थांशी संबंधित दोन व्यक्ती आणि अनेक दलालांचा समावेश होता. त्यानंतर सीबीआयने 14 ऑक्टोबर रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात महाराष्ट्रातील चहा विक्रेता शेषराव बजरंग सूर्यवंशी उर्फ राज सूर्यवंशी याचे नाव होते. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या 14 झाली आहे. (NEET Paper Leak)
आपला खटला सिद्ध करण्यासाठी सीबीआयने 360 साक्षीदार, 422 कागदपत्रं आणि 43 वस्तूंचा आधार घेतला आहे.आतापर्यंत सीबीआयने कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा एनटीएच्या पदाधिकाऱ्याला आरोपी बनवलेले नाही. सीबीआयचे म्हणणे आहे की, ही पेपरफुटी विषय तज्ज्ञ आणि खासगी व्यक्तींच्या नेटवर्कमुळे झाली आहे. या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. (NEET Paper Leak)
दरम्यान, नीट-यूजी परीक्षा 3 मे 2026 रोजी झाली होती. त्यासाठी सुमारे 22 लाख विद्यार्थी बसले होते. पेपरफुटीचे आरोप समोर आल्यानंतर राष्ट्रीय चाचणी संस्थेने 12 मे रोजी परीक्षा रद्द केली होती. त्यानंतर 21 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. (NEET Paper Leak)





