Paris Diamond League 2024 : गोल्डनबाॅय ‘नीरज चोप्रा’ची पॅरिस डायमंड लीगमधूनही माघार; समोर आलं ‘हे’ कारण…

Paris Diamond League 2024 : ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियन नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगमध्ये सहभागी होणार नाही. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीच्या समस्येमुळे पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतली आहे. रविवारी डायमंड लीग होणार आहे. नीरज चोप्राची दुखापत हा भारतासाठी मोठा धक्का आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही स्पर्धा या महिन्याच्या 26 तारखेपासून सुरू होणार आहे. नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा दावेदार आहे.
नीरज चोप्रा प्रशिक्षण आणि थ्रोिंग करताना त्याचा ब्लॉकिंग लेग मजबूत करण्यासाठी काम करत आहे. ईएसपीएनशी बोलताना तो म्हणाला, “भाला फेक करतेवेळी ब्लाॅकिंग करणारे लेग (पाय) मला मजबूत करायचे आहेत कारण त्याच वेळी मांडीला ताण येतो. त्यावर आम्ही काम करत आहोत. मी आणखी काही स्पर्धा खेळू शकलो असतो आणि मला खेळायचेही होते. पण मला वाटले की, फिटनेसकडे प्रथम लक्ष्य दिले पाहिजे त्यामुळे थोडा तरी त्रास जाणवत असेल तर त्यासाठी थांबणे योग्य आहे.”
नीरज चोप्राने गेल्या महिन्यात फिनलंडमध्ये झालेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नीरज म्हणाला की, तो आता समजूतदार झाला आहे आणि जोखीम घेत नाही.
तो म्हणाला, “ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्यापूर्वी मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा होता. पण आता अनुभवाने मी योग्य निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. फिनलंडमधील कामगिरी चांगली होती पण मला अजून काम करायचे आहे.”





