Neeraj Diamond League : नीरज चोप्राची झुरिचमध्ये न खेळताही फायनलमध्ये धडक; ९२.०७ मीटर फेकणाऱ्या खेळाडूशी होणार महामुकाबला
Neeraj Diamond League : नीरजने विश्रांती घेत झुरिच स्पर्धेत भाग घेतला नसला, तरी पूर्वी मिळवलेल्या १२ गुणांच्या जोरावर त्याने सहावे स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Neeraj Chopra Qualifies For Diamond League Final 2026 In Brussels Finished 6th In Standings : भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) ब्रुसेल्स येथे ४ आणि ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्रतिष्ठित डायमंड लीग २०२६ च्या फायनलमध्ये (Diamond League Final) आपले स्थान पक्के केले आहे. २६ ऑगस्ट रोजी झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगच्या अखेरच्या टप्प्यानंतर फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या अव्वल ६ खेळाडूंची नावे निश्चित झाली. नीरजने विश्रांती घेत झुरिच स्पर्धेत भाग घेतला नसला, तरी पूर्वी मिळवलेल्या १२ गुणांच्या जोरावर त्याने सहावे स्थान पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुखापतीनंतर खबरदारी; फक्त दोन स्पर्धा खेळून मारली थेट बाजी –
मागील वर्षी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान पाठीला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर नीरज आपल्या फिटनेसबाबत अत्यंत सतर्क आहे. आगामी डायमंड लीग फायनल आणि त्यानंतर होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) साठी स्वतःला तंदुरुस्त आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी त्याने झुरिचमधून माघार घेतली होती. या संपूर्ण हंगामात नीरजने केवळ दोनच स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. दोहा डायमंड लीगमध्ये ८५.६९ मीटरच्या थ्रोसह चौथे स्थान, तर लॉसने (Lausanne) डायमंड लीगमध्ये ८८.०५ मीटरचा या मोसमातील सर्वोत्तम थ्रो करत त्याने गुणतालिकेत आवश्यक गुण मिळवले.
फायनलमध्ये पोहोचले ६ तगडे भालाफेकपटू; पाहा संपूर्ण यादी –
Neeraj Chopra has qualified for the men’s javelin throw final of the 2026 Diamond League despite missing the Zurich leg, with the Indian star’s points tally enough to secure his place in the season-ending event in Brussels. Chopra has accumulated 12 points from his appearances in… pic.twitter.com/v6o3ozdPJ9
— The Statesman (@TheStatesmanLtd) August 28, 2026
डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा रुमेश थरंगा ३९ गुणांसह अव्वल स्थानी आहे. ग्रॅनडाचा अँडरसन पीटर्स ३५ गुणांसह दुसऱ्या, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशोर्न वॉलकॉट २३ गुणांसह तिसऱ्या, अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन २० गुणांसह चौथ्या, केनियाचा ज्युलियस येगो १३ गुणांसह पाचव्या आणि भारताचा नीरज चोप्रा १२ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा रुमेश थरंगा ठरणार नीरजसमोर सर्वात मोठा अडथळा –
ब्रुसेल्समधील विजेतेपदाच्या लढतीत नीरजसमोर श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पथिरागेचे (Rumesh Tharanga Pathirage) सर्वात मोठे आव्हान असणार आहे. थरंगाने झुरिच डायमंड लीगमध्ये चक्क ९२.०७ मीटर लांब भाला फेकून आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. थरंगाचा हा जबरदस्त फॉर्म पाहता, डायमंड लीगच्या ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरण्यासाठी नीरजला अंतिम फेरीत आपली सर्वोत्तम ताकद पणाला लावावी लागणार आहे.





