Neeraj CWG Final : खराब हवामानातही भारताचा तिरंगा फडकला! नीरज चोप्रासह तिन्ही भारतीय भालाफेकपटूंचा फायनलमध्ये प्रवेश
Neeraj CWG Final : नीरजसोबतच भारताचे रोहित यादव आणि यश वीर सिंह या दोघांनीही अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले आहे.

Neeraj Chopra Rohit Yadav Yash Veer Singh Arshad Nadeem Javelin Throw Qualification CWG 2026 : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games 2026) भालाफेक प्रकारातून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने अपेक्षेप्रमाणे पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत (Final) धडक मारली आहे. विशेष म्हणजे, नीरजसोबतच भारताचे रोहित यादव आणि यश वीर सिंह या दोघांनीही अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले असून, पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अरशद नदीमही (Arshad Nadeem) अंतिम फेरीत पोहोचला आहे.
प्रतिकूल हवामानातही नीरजची बाजी!
ग्लास्गोमधील थंड हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे खेळाडूंना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. ८४ मीटरचा ‘ऑटोमॅटिक क्वालिफिकेशन’ मार्क एकाही ॲथलीटला गाठता आला नाही. नीरज चोप्राने आपल्या सर्वोत्तम प्रयत्नात ७९.६१ मीटर अंतरावर भाला फेकत दोन्ही ग्रुपमधील कामगिरीच्या जोरावर पाचवे स्थान पटकावून अंतिम फेरी गाठली. या क्वालिफिकेशन फेरीत नीरजने पाकिस्तानच्या अरशद नदीमपेक्षा (७८.६३ मी) जास्त दूर भाला फेकला.
Strong statement by the javelin boys! 💪
Neeraj Chopra (79.61m), Rohit Yadav (78.37m) and Yash Vir Singh (78.36m) qualify for the Men’s Javelin Throw Final at #Glasgow2026! 👏
Watch them in the final on 1st August, 12:45 AM onwards, LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV… pic.twitter.com/nxDDlDSbyE
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 30, 2026
तिन्ही भारतीय फायनलमध्ये; पदकाच्या आशा उंचावल्या!
भारतासाठी सर्वात मोठी समाधानाची बाब म्हणजे तिन्ही खेळाडूंनी टॉप-१२ मध्ये जागा मिळवली आहे:
- नीरज चोप्रा: ७९.६१ मी (५ वे स्थान)
- रोहित यादव: ७८.३७ मी (९ वे स्थान)
- यश वीर सिंह: ७८.३६ मी (१० वे स्थान)
श्रीलंकेच्या रुमेश पथिरागेने ८२.८४ मीटर थ्रो करत अव्वल स्थान पटकावले, तर अरशद नदीम ७८.६३ मीटरसह सातव्या स्थानावर राहिला. आता संपूर्ण देशाचे लक्ष फायनल सामन्यावर असून भारत तीन पदके जिंकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





