Neera Bhima Sugar Factory : हंगाम संपला अन् खात्यात पैसे आले! नीरा भीमा कारखान्याची राज्यभरात चर्चा
Neera Bhima Sugar Factory : ५ लाख २५ हजार मेट्रिक टन गाळपाचा टप्पा पूर्ण; ३१०१ रुपये प्रति टन दराने सर्व ऊस बिले अदा करणारा राज्यातील अग्रगण्य कारखाना.

Neera Bhima Sugar Factory – सहकार क्षेत्रात शिस्तबद्ध आर्थिक व्यवस्थापनाचा आदर्श ठेवत शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखाना यांनी चालू 2025-26 च्या गळीत हंगामातील गाळप झालेल्या सर्व ऊसाचे पहिले हप्ते प्रती टन 3101 रुपये या दराने शेतकर्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी (दि. 20) जमा केले.
चालू हंगामातील संपूर्ण ऊसाची बिले वेळेत अदा करणारा हा राज्यातील बहुधा पहिलाच कारखाना ठरल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2025-26 चा गळीत हंगाम दि. 6 फेब्रुवारीअखेर यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
या हंगामात कारखान्याने 5 लाख 25 हजार 657 मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. गाळप झालेल्या सर्व ऊसाची बिलरक्कम शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असून, सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त व शेतकरी बांधिलकीचा नवा मापदंड कारखान्याने प्रस्थापित केल्याची प्रतिक्रिया ऊस उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.
ऊस उत्पादक शेतकर्यांसह ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांची बिलेही नियमितपणे अदा करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या यशस्वी गळीत हंगामाबद्दल संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी व हितचिंतक यांचे संस्थापक हर्षवर्धन पाटील,
अध्यक्षा भाग्यश्री पाटील व उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी अभिनंदन केले.दरम्यान, आगामी 2026-27 च्या गळीत हंगामात विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने आतापासूनच नियोजनास प्रारंभ केल्याची माहिती अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.




